७०

मागच्या गोष्टीतील तो तरुण सेवक. याची गोष्ट आणखी पुढे सांगतो.

त्या तरुण काँग्रेस कार्यकर्त्याला गांधीजींचे कठोर बोलणे पटले. मनात दु:ख त्याला झालेच. तरी पण त्या कठोर भाषणाच्या मागे दडून राहिलेले तत्त्व त्याला पटले. तो तेथून उठला नि जड पावलांनी जाण्यास निघाला. हृदयात धडधडत होते. पावले जड पडत होती. भविष्यकाळ अंधाराने भरल्यासारखा दिसत होता. तो दरवाजापर्यंत तर गेलाच, पण उंबरठ्यावरून त्याची पावले पुन्हा मागे वळली. तो गांधीजींजवळ येऊन बसला आणि चाचरत म्हणाला :

‘बापू तुमचा उपदेश पटला मला. पण मी कंगाल आहे. खिशात दमडीही नाही. कसेबसे पैसे मिळवून इथपर्यंत तर आलो. आता परत कसा जाऊ? परत जायला काहीही करून पस्तीस रुपये द्या. मी ते शक्य तेवढ्या लौकर परत करीन.’

बोलणे संपवून तो बापूंजवळ मान खाली घालून बसला. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. बापूंनाही वाईट वाटले. पण ते म्हणाले :

‘माझ्याकडं काहीही मिळणार नाही. अगोदरच एक हजार रुपयांची जबाबदारी घेऊन बसला आहेस. त्यात ही आणखी भर नको. नवीन आयुष्य तुला सुरू करायचं आहे ना? तर मग नवीन आयुष्याची सुरुवात कर्ज राढून नको करू. निराळा मार्ग काढ. त्यातच तुझं हित आहे.’

तो तरुण उठला. हा त्याला दुसरा धक्का होता. एक हजार रुपयांची सोय तर लावायची होतीच. तो बाहेर जाऊ लागला. पण त्याच्या चेह-यावर नव्या आयुष्यात एक नवीनच तेज दिसत होते. काहीशा आत्मविश्वासाने तो बाहेर पडला.

त्याच्या पाठोपाठ दीनबंधू अ‍ॅण्ड्र्यूजही गेसे. त्यांनी त्या तरुणाला तिकिट काढून दिले. दीनबंधू आश्रमात परत आले. त्यांना हसू येत होते. बापू हसून म्हणाले, ‘कळली तुमची लबाडी. उगीच का दीनबंधू नाव पडलं तुम्हांला?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel