६८
ते नौखालीतले दिवस. गांधीजी अश्रू पुसायला, धीर द्यायला गेले. सर्वत्र भीतीचे वातावरण. हिंदू घरांतून बाहेर पडत नव्हते. घरेदारे भस्म झालेली, माणसांच्या कत्तली झालेल्या, धर्माच्या नावाने अधर्माचे राज्य सुरू होते. त्या अंधारात प्रकाश द्यायला, त्या भीतीत अभय द्यायला राष्ट्रपिता निघाला. महात्माजींनी जंग जंग पछाडले. परंतु जनता बाहेर यायला धजेना. गांधीजींना क्षणभर निराश वाटले.
एके दिवशी त्यांच्याबरोबरच्या लोकांनी एक युक्ती केली. ते चेंडू वगैरे रस्त्यात खेळू लागले. घरांतून मुले डोकावत होती.
‘या बाळांनो, खेळायला या. बापूंबरोबर खेळायला या’ असे बापूंचे लोक म्हणाले आणि ती मुले आली. खेळ म्हणजे मुलांचा आत्मा. ती खेळांत रमली, धावू, पळू लागली. हसू...खेळू लागली.
मग एके दिवशी तिरंगी झेंडा तेथे लावण्यात आला.
‘या झेंडागीत म्हणू.’ बापूंचे लोक म्हणाले.
आणि ‘झेंडा उँचा रहे हमारा’गीत गाण्यात आले.
‘आता ‘रघुपति राघव राजाराम’ म्हणत चला आमच्याबरोबर. येता ना?’
‘हो, हो;चला.’
आणि मिरवणूक सुरू झाली. मुले ‘रघुपति राघव राजाराम’ म्हणत निघाली. मुलांच्या पाठोपाठ घरांतून डोकावणारे मायबापही बाहेर पडले. कसं ‘रामनाम घेतात ते बघू’ असे धर्मवेडे मुसलमान म्हणायचे. परंतु ती बालकांची मिरवणूक, रामाच्या वानरसेनेची ती मिरवणूक बघून मुसलमान दिपून गेले. जयघोष करीत जाणा-या त्या मिरवणुकीकडे ते बघतच राहिले. मारायला हात वर झाला नाही. त्यांचेही का हृदय उचंबळले होते? मुलाबाळांवर अपार प्रेम करणारे पैगंबर महंमद का त्यांच्याही हृदयात उभे राहिले?
त्या दिवशी गांधीजींच्या डोळ्यांतून कधी न येणारे दोन अश्रू आले. ते म्हणाले, ‘आज अंधारात मला प्रकाश मिळाला, मला आशा मिळाली. निष्पाप मुलांच्या श्रद्धेचं हे बळ!’
विनोबाजी बाल शब्दाची व्युत्पत्ती बल ज्याच्याजवळ आहे तो बाल, अशी करतात ती उगीच नाही. प्रल्हाद, ध्रुव, चिलया, रोहिदास, इत्यादी भारतीय बाळांचा केवढा महिमा!