२९
१९३१ मधील ती गोष्ट. ३० सालचा स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला होता. महात्माजी आणि व्हाइसरॉय यांच्या वाटाघाटी होऊन सारे सत्याग्रही मुक्त झाले होते. दिल्लीचा जो गांधी-आयर्विन करार झाला त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी कराचीला काँग्रेसचे अधिवेशन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात भरणार होते. परंतु या अधिवेशनावर काळी छाया पसरली होती. अधिवेशन भरण्याच्या एक-दोन दिवस आधी सरदार भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आले होते. सरकार आणि काँग्रेस यांच्यामध्ये सलोखा निर्माण होण्याच्या वेळेस त्या थोर तरुण देशभक्तांना फाशी देणे दुष्टपणाचे होते. कराची काँग्रेसमध्ये दुफळी माजावी असाही सरकारी हेतू असेल. फाशीची शिक्षा रद्द करावी म्हणून महात्माजींनी फारसे प्रयत्न केले नाहीत, अशी सीमा प्रांतातील लाल डगलेवाल्या खुदाई-खिदमतगारांची- देवाच्या सेवकांची- समजूत झाली होती. अर्थात ती चुकीची होती. महात्माजींनी शक्य ते सारे केले होते. तरीही नवजवान प्रक्षुब्ध झाले होते.
महात्माजी कराची काँग्रेसला जात होते. वाटेत लाल डगलेवाल्यांनी त्यांना काळी फुले दिली. ती निषेधाची चिन्हे होती. पुढे ते कराचीला पोचले. अधिवेशनास सुरुवात झाली त्या दिवशी महात्माजींनी शांतपणे ती स्वीकारली आणि जपून ठेवली. रात्री एक प्रचंड सभा ठेवण्यात आली होती. त्या सभेत महात्माजी बोलणार होते. तुम्ही सभेला जाऊ नका, जमाव खवळलेला आहे, असे महात्माजींना परोपरीने सांगण्यात आले. ते म्हणाले, ‘म्हणूनच मला गेले पाहिजे. माझ्यावर त्यांचा राग आहे. तो शांत करायला मी गेलं पाहिजे.’
आणि हा महापुरुष धीरगंभीरपणे निघाला. ती लहान परंतु आत्मशक्तीने महान अशी मूर्ती उंच व्यासपीठावर चढली. समोर प्रक्षुब्ध तरुण राष्ट्र होते. क्षणभर सारे शांत होते. महात्माजींनी शांत दृष्टीने सभेवती पाहिले आणि ती अमर वाणी, प्रांजळपणे सुरू झाली. शेवटी ते म्हणाले, ‘माझी ही मूठभर हाडं तुम्ही सहज चिरडून टाकाल. परंतु ज्या तत्त्वासाठी मी उभा आहे, ज्या तत्त्वाचा मी उपासक आहे, ते कोण चिरडू शकेल? ती शाश्वत सत्ये आहेत.’
सभा मोडायला आलेले प्रणाम करून स्फुंदत निघून गेले. राष्ट्रपिता शांतपणे शिबिरात आला.