११९
कोणाकडे तरी महात्माजी उतरले होते. महत्त्वाचे काही तरी ते लिहित होते. तेथे जवळच ठेवलेले एक लहान मूल गडबड करीत होते. कागदपत्र उडवीत होते. परंतु बापूंनी त्या मुलाला काही केले नाही. त्याला ते खेळूखिदळू देत होते. परंतु मूल रडू लागले. आता? तेथे हरिजनकार्यासाठी कोणी तरी दिलेला दागिना होता. गांधीजींनी तो सोन्याचा दागिना सोन्यासारखा त्या मुलाला खेळायला दिला. मूल खेळू लागले; बापू लिहू लागले.
१२०
महात्माजी बारीकसारीक गोष्टींतही फार लक्ष देत. त्यांचा सत्याचा प्रयोग सर्वत्र होता. गोलमेज परिषदेच्या वेळची गोष्ट. जेवताना ते थोडा मध घेत असत. त्या दिवशी गांधीजींना जेथे जेवण घ्यायचे होते तेथे मीराबेन नेहमीची मधाची बाटली घ्यायला विसरल्या. जेवायची तर वेळ होत आली. मीराबेनना मधाची आठवण झाली. बाटली तर मुक्कामावर राहिली. आता? त्यांनी लगेच कोणाला तरी जवळच्या दुकानात पाठवून मधाची बाटली मागवून घेतली.
गांधीजी खाणे खायला बसले. मध वाढण्यात आला. परंतु त्यांचे लक्ष त्या बाटलीकडे गेले.
‘बाटली नवी दिसते. मधाची रोजची बाटली ही नाही दिसत.’... ते म्हणाले.
‘होय बापू. ती बाटली घरी राहिली. म्हणून इथं ही पटकन् आणली.’... मीराबेन भीतभीत म्हणाल्या.
थोडा वेळ गंभीर होऊन नंतर महात्माजी म्हणाले;
‘एक दिवस मध नसता मिळाला म्हणून मी काही उपाशी नसतो राहिलो. परंतु नवी बाटली कशाला आणली? आपण जनतेच्या पैशावर जगतो. जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही होता कामा.’... ते म्हणाले.