१८
साबरमतीचा आश्रम नुकताच सुरू झाला होता. दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाचा यशस्वी प्रयोग करून गांधीजी स्वदेशी परतले होते. गुरु नामदार गोखले यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदुस्थानभर हिंडून साबरमतीच्या तीरावर आश्रम स्थापून ते साधना करीत होते. महात्माजी कधी अहमदाबादच्या बाररूममध्ये जात. चर्चा करीत. सरदार वल्लभभाई पत्ते खेळत असत. गांधीजींना कोणी फारसे महत्त्व देत नसत. परंतु हळूहळू काही वकील मंडळींना कुतूहल वाटू लागले. गांधीजींजवळ काही काम मागावे असे त्यांना वाटले.
एके दिवशी आश्रमात गांधीजी नि त्यांचे सहकारी काम करीत होते. सारे स्ववलंबन होते. महात्माजी विनोबाजी एका जात्यावर दळीत. किती थोर अनुभव! परंतु आज दळणे नव्हते. निवडणे होते. आधी निवडून मग दळावे. गांधीजी, विनोबाजी वगैरे सारे धान्य निवडीत बसले होते.
इतक्यात काही वकील लोक आले. तेथे बसायला शिंदीची चटई घालण्यात आली.
‘बसा’ गांधीजी म्हणाले.
‘आम्ही बसायला नाही आलो, आम्हांला काही काम द्या. तुमचं काहीतरी काम करावं म्हणून आम्ही आलो आहोत.’
‘ठीक. आनंदाची गोष्ट आहे.’ असे म्हणून दोन-तीन ताटांत धान्य घालून बापूजींनी त्या वकील बंधूंसमोर ठेवले.
‘हे धान्य निवडा. नीट निवडा.’
‘ही ज्वारी-बाजरी का आम्ही निवडीत बसू?’
‘हो. आता हेच काम आहे.’
काय करतील बिचारी. ते पोषाखी वकील धान्य निवडीत बसले. नमस्कार करून गेले. पुन्हा काम मागायला ते कधी आले नाहीत. गांधीजींनी स्वातंत्र्याचा लढा करणे; अस्पृश्यता जावी म्हणून उपवास करणे, हे जितके महत्त्वाचे वाटे, तितकेच डाळ-तांदूळ निवडणेही वाटे. हे बायकांचे तुच्छ काम, असे त्यांनी कधी म्हटले नाही. सेवेचे प्रत्येक कर्म पवित्र आहे. प्रत्येक कर्मात आत्मा ओता. ते नीट करणे म्हणजेच देवाची पूजा, म्हणजेच मोक्ष.