५५
लंडनला १९३१ मध्ये गेल्यावर गांधीजी मिस म्युरियल लीस्टरकडे गरीब वस्तीत उतरले होते. म्युरियलबाई तत्पूर्वी एकदा हिंदुस्थानात आल्या होत्या. त्या वेळेस बापू साबरमतीच्या आश्रमात होते.
‘तुम्ही इंग्लंडला या ना.’ त्या म्हणाल्या.
‘कशाला येऊ? तुम्हांला शिकवण्यासारखं अजून माझ्याजवळ काही नाही. आमचा सत्याग्रहाचा प्रयोग यशस्वी होऊ दे, मग बघू.’
‘परंतु आम्हांला शिकवायला या, असं नाही माझं म्हणणं.’
‘मग कशाला येऊ?’
‘आमच्यापासून शिकायला या.’
गांधीजींच्या मुखावर आनंद फुलला. ते म्हणाले, ‘खरंच, तिथं अनेकांना भेटता येईल. जॉर्ज डेव्हिस वगैरेंचे अनुभव विचारता येतील. यायला हवं खरं. येईन मी.’
‘छान. कधी याल?’
‘माझ्या शर्ती कबूल करा.’
‘सांगा तर ख-या.’
‘मँचेस्टरच्या गिरणीमालकांना इकडे कापड पाठवू नका, म्हणून सांगा. पार्लमेंटच्या सदस्यांना आणि मंत्रिमंडळाला हिंदुस्थानला स्वराज्य देऊन टाका, असं सांगा. तिसरी गोष्ट म्हणजे- ब्रिटिश सत्तेमुळं आमच्याकडे जिकडे तिकडे दारू फैलावली आहे. दारूच्या उत्पन्नातून तिथं शिक्षण दिलं जातं. हे पाप आहे. अफूचाही व्यापार हिंदुस्थानमध्ये ह्यांनी चालू ठेवला आहे. अफू वाईटच, परंतु दारू तिच्याहून वाईट. अफू खाणा-यांचं नुकसान करते; दारू सर्व कुटुंबाचं. स्त्रियांचे हाल तर विचारू नका. म्हणून तिकडे जाऊन हिंदमधील दारू व अफू बंद व्हावीत असा प्रचार करा. या तीन गोष्टी करा. मग मी एक कोटी हिंदी लोकांच्या सह्या घेऊन स्वत:च्या खर्चानं विलायतेत येईन व हिंदी मताला मान द्या, म्हणून सांगेन.’
‘मी शक्य ते करीन.’ म्युरियलबाई म्हणाल्या.’
नुकत्याच या भगिनी हिंदुस्थानात येऊन गेल्या. सेवाग्रमला गांधीजींच्या झोपडीत त्या उभ्या राहिल्या. ‘बापूंच्या शिवाय बापूंची झोपडी’ असे त्या म्हणाल्या. ‘इथं लहान मुलांना आर्यनायकम आणि आशादेवी शिकवीत आहेत. बापूंचा आत्मा इथं आहे, सर्वत्र आहे.’