५०
महापुरुष सत्यव्रत असतात. जो शब्द दिला तो पाळतात, म्हणून रामचंद्राला आपण एकवचनी मानतो.
रघुकुल रीति सदा चलि आई
प्राण जाइ पर बचन न जाई।।
प्राण गेला तरी दिलेले वचन जाणार नाही, असा रघुकुलाचा महिमा होता. श्रीरामकृष्ण परमहंस तोंडातून जो शब्द बाहेर पडला तो सत्य धरीत. समजा, कोणी ‘दूध घ्या’ म्हटले आणि तोंडातून ‘नको’ शब्द बाहेर पडला तर रामकृष्ण परमहंस मग दूध घेत नसत. जो शब्द बाहेर पडला, त्याची का फसवणूक करावयची? तो का वाया दवडायचा? महात्मे अशा तीव्रतेने सत्याची उपासना करतात. महात्माजींचेही असेच असे. कलकत्त्याचे ‘मॉडर्न रिव्ह्यू’ मासिक जगप्रसिद्ध आहे. त्याचे संपादक रामानंद चतर्जी आता जिवंत नाहीत. परंतु ते होते त्यावेळेची गोष्ट आहे. १९३० सालच्या आधीचा प्रसंग. रामानंदांनी महात्माजींना मासिकासाठी लेख लिहायला सांगितले होते.
‘मला वेळ केव्हा होणार?’ बापू म्हणाले.
‘चार ओळी तरी पाठवा.’
‘बरं, केव्हा तरी पाठवीन.’
महात्माजींच्या शिरावर राष्ट्राचा संसार. लाहोरची काँग्रेस झाली. स्वातंत्र्याचा ठराव झाला. महात्माजींनी व्हाइसरॉयांकडे त्या ऐतिहासिक अकरा मागण्या केल्या. सरकारचा नकार आला. स्वातंत्र्याचा देशव्यापी संग्राम कसा सुरू करायचा, याच्या विचारात महात्माजी व्यग्र होते. त्यांना मीठ दिसले. मिठाचा कायदेभंग करायचा असे ठरले. ते आश्रमातून बाहेर पडले. पायी प्रवास, मुलाखती, प्रार्थना, सभा-अपार कार्य. परंतु त्यातही महात्माजी म्हणायचे : ‘मॉडर्न रिव्ह्यूला लेख पाठवीन असं म्हटलं आहे. केव्हा वेळ काढू?’ रोज त्यांना त्या दिलेल्या शब्दांचे स्मरण होई. शेवटी एके दिवशी लहानसा लेख राष्ट्रपुरुषाने पाठविला.
त्या लेखाची गंमत झाली. तो लहानसा लेख त्या मासिकाच्या कचेरीत कोठे पडला कोणास माहीत! रामानंदांचे पुन्हा पत्र आले. महात्माजींनी उत्तर लिहिले : ‘लेख तर पाठविला.’ मग शोधासाठी धावपळ सुरू झाली. तो केराच्या टेपलीत सापडला. ते अमोल शब्द सापडले. रामानंदांनी महात्माजींना पत्र लिहून दिलगिरी दाखविली. अशी ही गोष्ट आहे. शब्द दिला तर पाळावा. अशक्य अपरिहार्यच झाले, तर गोष्ट निराळी.