भोगुं द्या, प्रीत होउं द्या, राग जाउं द्या, जरा येउंद्या
कांही कनवाळा ।
ठेविला जिव पुढें, जिव माझा तुम्ही संभाळा ॥धृ०॥
नूतन नवतीच्या पहिल्याभरीं
रिकामी फिरते कीं घरभरी
तुम्हाविण न गमे मज क्षणभरी
लागला छंद चांगला तुमचा मला, एकांतीं चला, मी पडते पाया ।
हंगाम हे पिकाचे, दिस हे जाती वाया ।
दशदिशा रिकाम्या कशा, तुम्हाविण जशा लागली आशा,
वाहिली काया ।
करुं नका कमी काडिमात्र माझी माया ।
चुरुमुरून मन झुरझुरून, जाते मरमरून तुमच्यावरून
अहो गुणिराया ।
निर्वाण काळिं हा प्राण घेतसे द्याया ।
डगमगले विषयानळीं
सर्वांगिं मदन जळजळी
वाटे उडि घालूं जवळी
घ्या कुशीं पराची उशी, मी जाहले खुषी धरून
हवी तशी मशी कुरवाळा ॥१॥
दिसोदिस ममता मनिं वाढली
घातली रेषा कधिं मोडली ?
आपली सेवा म्या जोडली
सौभाग्यधनाबंधना ! सकळसाधना,
हेमवदना, कल्पना सोडा !
हा घटित योग्य ब्रह्मानें निर्मिला जोडा ।
हा मेवा संग्रही ठेवा, रातींचि जेव्हां,
पाहिजे तेव्हां बलाऊं धाडा ।
हौसेनें मला द्या बांधुन दुसरा वाडा ।
भोजनास डावीकडे, जडे मी पुढें,
मला आवडे, सुधारस वाढा ।
आप दृष्टीं हुजूर अन्याई धरून नाडा ।
रानांत हरण येकली
पडले मायाचिखलीं
निर्जल जाई सुकली
मागली वळख जागली, चतुर चांगली,
मला लागली आपली शाळा ॥२॥
पुढें पुढें आपलें मुख दाविते
अंगाला तुमच्या ‘अंग लाविते
सुरतसंगाला बोलाविते
मी सदा शरण या पदा, दाविते आदा,
रोज दाहदां पसरिते ओटी ।
आपली मान कापली तरी मी चखोटी ।
हळहळत, नयनजळ गळत, वृथा कळकळत,
शरिर तळतळत, जळत अंग पोटीं ।
अवसानसमइ मग होते घाबरी मोठी ।
फळ पिकों, लक्ष हें टिकों, पाइं देह विको,
तुम्हांविण नको द्रव्य धन कोढी ।
आवडली मला बरी सख्या तुझी हातोटी ।
केवळ कोमळ नार मी
श्रमले अजवर फार मी
गळीं पडले निराधार मी
सांगतां, मार्ग लागतां, जपुन वागतां,
कसा उभयतां मिळाला ताळा ॥३॥
चालते मर्जीच्या अन्वयें
अंतरीं जाहले मी निर्भये
वाट पाहायाला लावुं नये
स्नेहरसें उणेपण दिसे, चांगलें नसे,
विसरतां कसे गरिबगोराला ? ।
लाहनानें काय तरी शिकवावें थोराला ? ।
आडले, जवळ वाढले, भरी पाडलें,
भलि सापडले वेव्हाराला ।
कस्तुरी मिळाली ही मैलगिरीला ।
मी खास पदरची दास, धरियली कास,
आहे बारमास आधाराला ।
नाहीं जात कधीं पुसल्याविण माहेराला ।
बरोबर मजला हो नेणें
काय पुरुषावेगळें जिणें !
करुं शेवट केल्या पणें
तारणें ! नगो धारणे (?) ! हे श्रमहरणे,
लोभ करा म्हणे होनाजी बाळा ।
घरीं येतो हमेशा, सखे, नको देउं टाळा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel