पुरें कर नटपण तुझें, समजले चित्तामधें प ले आणुन ।
घडुं नये तें घडल्याचें. अंतीं अतां जशी काय म्हणुन ॥धृ०॥
तूं पहिले गुण टाक, पदरचें काय तुझें जातें यामधें ? ।
पहा प्रियकर मग किती लागते जशी शर्करा पयामधें (दह्यामधें) ? ।
पहिल्यापेक्षां गोड प्रीत गडे तुझी उतरत्या वयामधें ।
लवणरुच्या पहावी कालच्या दिशीं विरजल्या दह्यामधें ।
प्राणापेक्षां आवडती बहुत हजारो स्त्रियांमधें ।
यावर उभे राहिलें म्हणुन तुझ्या अम्ही कह्यामधें ।
भरगच्ची किनखाप प्रीतीचा सखे असा मधें टाक विणुन ॥१॥
तूं प्रीतिचें आगर, भरती आली समुद्रावाणी ।
उंच खरेदी माल कराया आलों जसे बंद्रा वाणी ।
तूं खोलींत येतांक्षणी रात्रौ दीप दिसे चंद्रा वाणी ।
अशा रुपास्तव वेडे होउं तुज मागें सीतारामचंद्रावाणी ।
अपली ही म्हणतांना ठरशिल अप्रमाण शुद्रावाणी ।
व्यर्थ वर्णिली म्हणूं तुला मग खोटया जरी पदरावाणी ।
घे, केला देह नदर आमचा सर्व विषय घेतला छिणुन ॥२॥
तूं सोन्याची भिंत, गिलावा नक्षीकाम वरकरणीचें ।
कमळ जसें मुख तसें सर्वदा स्वरुप नव्हे वरकरणीचें ।
बहुत निबिड द्राक्षापरि हलती काप घोस तव कर्णींचे ।
निर्मळ मन किति स्वच्छ, पहावें पाणी जसें पुष्करणीचें ।
धातुपुष्ट तूं सखे औषधी जाड जसें गोखर्णीचें ।
कर आता येक चित्त मधुकरापाशीं जसे मधुअकरणीचें ।
लपवावी वाटते जसें तें द्रव्य जमिनिं ठेविती खणुन ॥३॥
इतकें जाहलें तरी सुंदरी कां ग अजुन न मन पाकळतें ? ।
वर वर म्हणशी मी साधी, पण मनामधें सारें कळतें ।
सर्वत्रा नारीचा अंश तूं, असे रत्न कोठें मिळतें ? ।
कसेंहि झालें तरी शेवटीं पाणी उतरणींला वळतें ।
पुरे स्पर्श येकदां, दहादां काय भोगल्यानें मिळतें ? ।
मी मी असें म्हणूं नको, विधिचें घटिताक्षर कोठें टळतें ? ।
किति प्रयत्नें स्नेह जाहल्याचे दिवस मनामधें पहा गणून ॥४॥
तूं जल्माची धनिण, तुजसाठीं प्राण शरिरांतुन काढूं ।
खा उभा करी केशरी भात तुझ्या पात्रीं वाढुं ।
नव्हे काळवटल, गौरवर्ण तूं चिकण जमिन जैशी शाडू ? ।
कुच दोन्ही निर्लेप सोवळ्यांतील जैसे बुंदी लाडू ।
विषय विषम तुजविषयीं आमच्या ह्रदयीं पेटला हा कंडू ।
किती चुकविशील ? भेटलो अम्ही दर्दाचे खिलाडु ।
होनाजी बाळा म्हणे, उभयतां करा देहाची घडी दुणुन ।
तूं परमेश्वरी अंश, अमच्या गेलिस ह्रदयांतरिं भिनून ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel