लाडे लाडे बोल लाडके लाड माझा चालवाल काय ? ।
घडी पैठणीची मोडता वेळे मजला बोलवाल काय ? ॥धृ०॥
मित्र सुजणा मनमोहना मन पवना वारू ।
संगीन जोडे एकाहून एक चढी धनी माझें तारू ।
भंडार भरपूर काळकंठकंदुर जगन्यांत पसरूं ।
कृपा तुम्हावर एकनाथाची त्रिकाळ कारभारू ।
बादशाही अकबर करु गेले अकबरीत मोहोरू ।
तुम्ही अगाध, तुम्ही सागर माझे ठिवला पडीभारू ।
मच हे (?) ताजवा वजनी बरोबर आजपुन तोलवाल काय ? ॥१॥
पैठणकर गंगातीरकर तुम्ही वचनी परिनिष्ठ ।
सिद्धसाधक शोधा, नाहीं यास्तव वचनीं एकनिष्ठ ।
काळ्याचे पांढरे पावला शहरांत बोभाट ।
ब्रीद आपलें सांभाळा, करणी करितां अचाट ।
गोरे भुरके निटस नेटके गाल, कवळे ओठ ।
झटझट जातां लटपट येतां मुके मटामट ।
माझ्या पिठांत मीठ निर्मळा गोडींत कालवाल काय ? ॥२॥
मित्र सुजाना, ये मनरंजना, नाहीं इष्काला जात ।
मायारूपी भगवान इष्कबाजी करून ते जात ।
मन हें चांडाळ, मन हें ओढाळ, मन जगीं म्हणत सुजात ।
मन मारिते, मन तारिते, जीव हा करितां अपराध? ।
शिक्षा रिन तुम्हांला आणून कबजांत ।
इंग्रेजी सवाल फेकले मजलीस पोहोचवला काय ? ॥३॥
इष्कांत गोड कांहीं पुसते तुम्हांला खुणगांठ आंतरची ।
त्यांतील वर्म आणि नाहीं वस्तू सारसाची ।
मागें पहा, पुढें पहा, खालीं पहा, वर पहा, वाट या जायाची ।
पिंड प्रचीती शाधुन पहावी आण एकनाथाची ।
मागील जी गाठडी घेतली परत करा आमुची ।
यावर सजना दम काय तुमचा, घडी मोडाल पैठणीची ।
जल्मा येउनी नामस्मरणें विठठल जागवाल काय ? ।
सगनभाऊच्या कवित्वा रावबाजीला ऐकवाल काय ? ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel