जाते सासर्‍या, कां तरी कष्टी निजला ?
अंत:करणापासुन रजा द्या मजला ॥धृ०॥
रसिक रसेल्या प्राणसख्या, या जवळी ।
जगा ज्योत मी सुंदर राजसबाळी ।
काढ मुखांतुन अधर वदन कवटाळी ।
तुझि आठवण, घातली कुसंबी चोळी ।
रडत फुदत ह्रदय धरून कवटाळी ।
तुझि प्रीत तोडिना मी कवणे काळीं ।
अक्षयी रहाते, असा ईस्वर कोठें पुजिला ॥१॥
जाते समयीं आलें पुसायासाठीं ।
दोन तर्‍हेच्या सांग छबेल्या गोष्टी ।
सद्‌गदित होऊन धरावें पोटीं ।
चैन पडल की काय गेल्यापाठीं ।
आवड तुला पाह्याची रे मला मोठी ।
कुठवर वर्णूं ? प्राण उरला कंठीं ।
द्वारी तुमचा मैत्र कीं कुजबुजला ॥२॥
प्राणवल्लभा, असुन पराची जाया ।
गोउन वचनीं कशी लाविलिस माया ? ।
जसा कर्दळी कोंब तशी तुझी काया ।
या उपरांतिक कधीं गवसल भोगाया ? ।
चंचल वृत्ती शांत करावी सखया ।
कवळुन धरिते, मुखीं घालते विडिया ।
सख्या तुझे धारानीं प्राण हा झिजला ॥३॥
बहुत प्रकारें आर्जवीत मैत्राला ।
दोहो महिन्यांचा खचित वायदा केला ।
पिवळा पीतांबर अपहस्तकीं नेसविला ।
देउन अलींगन घालवीत गेला ।
बाळा बहिरुचेंकवच विषाचा प्याला ।
गावुन वचनीं अग्नींतुन निघाला ।
धोंडीराज म्हणे चातुर ऐकुन रिझला ।
तुकाराम विश्राम जिवाचा भजला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel