येणें जाणें का रे वजिंले सख्या माझे घरीं ?
तुला मी काय बोलले तरी ? ॥धृ०॥
प्रीत होती तुझी माझी तेव्हां जें चलन वळण हें कसें ? ।
तुला मजविण क्षण करमत नसे ।
दिवसांतुन शतवेळ मजकडे येत होतां राजसा ।
अतां कां मन निष्ठुर मज फारसें ? ।
मी स्वरुपावर लुब्ध होउन कि रे तुजभोवत फिरतसे ।
भुकेली धनद्रव्याची नसे ।
इतकें असून चांडाळा आणसी दूषण माझे शिरीं ॥१॥
बहुत प्रयत्नें स्नेह उभयतां आहे ऐता जाहला ।
आतां नको अंतर देऊं मला ।
संतापामधें शब्द एखादा असन बोलले तुला ।
तोच तुज राग वाटतें आला ।
दगलबाजी तुशीं नाही करून पु नि संशय आपला ।
शपथ वाहते, एकांतीं चला ।
असत्य वाटेल तरी सख्या घे लेख लिहुन मज करीं ॥२॥
मी वेडी, मजला कळतें काय हें तुज मुळापसुन ठाउकें ।
तुझ्या संगतीने वर्ततें सुखें ।
तुजविण मज नावडती जिवलगा आणिक पुरुष पारखे ।
येत जा तुम्ही पहिल्यासारखे ।
विषयाचें लाविलें वेड हें त्वा मलाच इतुकें ।
आतां बोलत जा हसल्या मुखें ।
कशासाठीं धरिलांत अबोला रागें भरून मजवरी ? ॥३॥
सोड अलेला राग जिवाला, चरणिं डोइ ठेविते ।
अणिक जिव अपला संकल्पिते ।
आजपासुन सांगितलें ऐकुन हवी तशी वागते ।
परंतु एक ऐका सांगतें ।
तुम्हि न जावें परकीकडे येवढें द्या हो वचन मागतें ।
खचित सांगा मजला काय तें ।
होनाजी बाळा म्हणे, बोलणें येथुन आतां पुरे करी ।
समजलों राग नाहिं अंतरीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel