“सांगा सांगा या श्रीहरीला” गोपी म्हणताती ॥धृ०॥
“जात होतों आम्ही मथुरेसी ।
आडवा होतो हा ह्रषीकेशी ।
हे दु:ख सांगावें कोणासी ? ।
मुरली वाजवितो ग कान्हा या कुंजवनांत ।
भुलविल्या गोपी सार्‍या, काय सांगू मी मात ।
असा चेटकी ग हा कान्हा यशवदे माते ।
दुड दुड धावुन येतो जवळी ह्रदय कवळी ।
बोल मवाळी गडी गोपाळ घेऊन संगाती  ॥१॥
एके दिवशीं गोपी सार्‍या ।
जात होतों आम्ही परभार्‍या ।
दुरून मारितो पिचकार्‍या ।
कळंबाच्या वृक्षावरूनी हेरून येई ।
झाली गर्दी बाई रंगाची यशोदेबाई ।
गर्क आम्ही झालों त्या ठाई, सांगावें काई ।
धावून धरितो आम्हांस तिनदां ।
सच्चिदानंद श्रीमुकुन्दा झिडकावुनिया टाकी ॥२॥
नित वेढुनीया छळितो आम्हां ।
काय म्हणावें घनश्यामा ।
टाकुनी जाऊं तुमच्या ग्रामा ।
कंटाळा अवघ्या गोपिसी या श्रीरंगाचा ।
दहीदुध मागतो, आम्हांसी घरीं धाक पतीचा ।
गोपाळ लावितो पाठीशीं, करी नाश दह्याचा ।
पेंद्या सुदामा वडजवाकडा, मोठा ठकडा थट्टा करूनिया जाती,” ॥३॥
बोले यशवदा, “अरे जगजेठी ।
कां रे लागतोस गोपीपाठी ?
घेई घोंगडी हातांत काठी ।
घेउनिया जाई वनासी गाई-वत्सांगी ।”
उठले तात काढ (?) ह्रषीकेशी समजून मनासी ।
दावी मति सगनभाऊ शी छंद गाती विलासी ।
प्रसन्न झाला रुखमिणीवर, छंद प्रकार रामा हरी गुण गाती ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel