‘मुसमुसू नकोस; डोळे पूस. मुकाटयाने जाऊन ती पोळी खा. जा, जातोस की नाही? की देऊ दोन तडाखे?’  रघुनाथ म्हणाला.

इतक्यात सगुणाबाई पुराणाहून आल्याच. कृष्णनाथ एकदम आईला जाऊन बिलगला. तो ओक्साबोक्सी रडू लागला.

‘काय झाले, बाळ? उगी. असे तिन्ही सांजा रडू नये.’

‘दादाने मारले. आई, बघ किती मारले ते.’

कृष्णनाथ हुंदके देत होता, सगुणाबाई त्याला उगी करीत होत्या.रघुनाथ कोट-टोपी घालून बाहेर फिरायला गेला.

‘का ग मारलेत त्याला? तिन्ही सांजा असे मारावे का! तू खाल्लीस का पोळी, बाळ?’

‘वैनीने दिली नाही.

‘दिली नाही का? ती तेथे वाढून ठेवली आहे. साखरांबा वाटीत काढून ठेवला आहे.’  रमावैनी म्हणाली.

‘आता दिलन् ग आई; आधी नाही दिलन्. म्हणाली, तुला काय हात नाहीत? आणि दादाने मारमार मारलेन्.’

‘आणि तुम्ही खेळ उधळून दिला तो?’

‘पण त्याला तू शाळेतून आल्याबरोबर खायला काढून का ग नाही दिलेस? शाळेतून दमून-भागून तो आला. तुम्ही राजाराणी खाऊन कॅरम खेळत होतात. आणि काय ग, तिन्ही सांजा कॅरम खेळायची वेळ? काही काळवेळ आहे की नाही? काही उद्योग करायला नको. अशाने कसे होणार? आणि या बाळाचे तरी पुढे कसे होणार? आम्ही झालो म्हातारे. तो लहान आहे. उद्या त्याचे तुम्ही हाल कराल हाल.’

‘आई, तू दे ना मला खायला. तुझ्या हातांनी दे.’

‘चल.’

आईने दुसरी पोळी काढून दिली. दुसरा मुरांबा काढून दिला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel