‘दुस-या मुलांनी. त्यांची नावे मी सांगणे बरे नाही. तुम्ही प्रार्थनेच्या वेळेस पोपया खाणा-यांनी उभे राहावे, अशी आज्ञा करा. ते मग उभे न राहिले तर मात्र मी नावे सांगेन. परंतु त्यांच्या मागे कशाला सांगू?’
‘कृष्णनाथ, तू शहाणा आहेस.’ असे म्हणून चालक गेले.
रात्री प्रार्थनेच्या वेळेस चालकांनी कृष्णनाथाची स्तुती केली. त्याचा प्रामाणिकपणा, मित्रांची नावे त्यांच्या पाठीमागे न सांगण्याची वृत्ती, चुगलखोरपणाचा अभाव, घाण दूर करण्यातील नम्रता व सेवावृत्ती इत्यादी गुणांची प्रशंसा केली. छात्रालयातील आदर्श विद्यार्थ्यांस मिळणारे पदक कृष्णनाथास देण्यात येईल असेही ते म्हणाले.
गणेशचतुर्थीचा उत्सव होता. रवींद्रनाथांचे ‘एक घर’ हे नाटक बसविण्यात आले. कृष्णनाथाने त्यांतील मुख्य भूमिका केली होती. किती उत्कृष्ट त्याने ती वठवली! जिकडे तिकडे कृष्णनाथ, कृष्णनाथ होऊ लागला.
आणि दिवाळीच्या सुटीत तो घरी गेला. बोर्डीचे चिकू व बोर्डीची कोवळी शहाळी घेऊन गेला. विमलासाठी समुद्रतीरावरचे नाना प्रकारचे शंख, ते चुरमुरे, त्या गायिल्या, किती प्रकार तो घेऊन गेला. कृष्णनाथ घरी आल्यामुळे सर्वांना आनंद झाला. आपल्या छात्रालयातील तो शेकडो गमती सांगे. नाना प्रसंग वर्णी. सुटी पटकन् संपली आणि पुन्हा तो शारदाश्रमात आला.
असे दिवस जात होते. कृष्णनाथ शरीराने, बुध्दीने, हृदयाने वाढत होता. त्याचे विचार प्रगल्भ होऊ लागले. भावना अधिक उदार होऊ लागल्या. एकदा शाळेला दोन दिवसांची सुटी होती. बोर्डीतून जवळच असलेल्या बारडा डोंगरावर मुलांची सफर गेली होती. पारशी लोक प्रथम संजाणला उतरले. परंतु तेथेही एकदा धर्मसंकट येईल तसे वाटल्यावरुन ते आपला पवित्र अग्नी घेऊन या डोंगरावर आले होते असे सांगतात. तेथे होती असे सांगतात. दहापंधरा लाखांची वस्ती असेल. संजाणच्या एका टोकाच्या हवेलीवर मांजर चढले तर उंबरगांवापर्यंत त्याला खाली उतराण्याची जरुर नसे. इतकी घनदाट घरे होती. कृष्ण्नाथ तो सारा इतिहास ऐकत होता. ते पारशी आता सधन, समृध्द आहेत आणि आजूबाजूच्या जमिनीचे ते मालक बनले आहेत. इतरही सावकार आहेतच आणि मूळचे मालक आज जंगलात कसे तरी दिवस कंठीत आहेत. विद्यार्थ्यांनी त्या गरीब श्रमजीवींची घरे पाहिली. लहान लहान घरे. एका बाजूला बैल बांधायचा. एका बाजूस माणसे निजायची. शिंदीच्या चटईशिवाय काही झोपण्यास नाही. चार मडक्यांशिवाय भांडे नाही. कृष्णनाथ एका झोपडीत शिरला. तेथे टोपलीत कसला तरी पाला चिरलेला होता.
‘हा पाला कशाला?’ त्याने विचारले.
‘हाच रांधून खातो. याच्यावर जगायचे.’
‘आणि तांदूळ वगैरे नाही?’
ते दादा तुमच्यासाठी!