‘मला काही दिसत नाही.’
‘काही नाही?’
‘एकच दिसत आहे.’
‘ते काय?’
‘तुमच्या धाकटया भावाचे मरण!’
तिकडे कृष्णनाथ झोपेत होता. त्याला का स्वप्न पडत होते? स्वप्नात तो काही तरी बोलत होता. काय बोलत होता?
‘आई ये, ये. घे ना मला जवळ. मला कोणी नाही. दादा रागावतो. वैनी मारते. ये ना, आई.’
रघुनाथ उठला. तो कृष्णनाथच्या खोलीत गेला. शांतपणे तेथे तो उभा राहिला. तो पुन्हा शब्द कानांवर आले,
‘आई, घे ना मला जवळ.’
रघुनाथ खाली वाकला. त्याने कृष्णनाथच्या अंगावर पांघरुण घातले व त्याला जरा थोपटले. थोडया वेळाने तो आपल्या खोलीत परत आला. रमा खिडकीतून बाहेर बघत होती.
‘रमा-’त्याने हाक मारली.
‘ते बघ तिकडे काय ते! तुम्हांला दिसते का?’
‘सासूबाई नि मामंजी दोघं आहेत.’
‘तू पलंगावर पडून राहा. चल!’
त्याने तिला पलंगावर निजविले. डोळे मिटून ती पडून राहिली.
‘गेली का भीती?’
‘या घरात कृष्णनाथ आहे तोपर्यंत त्यांचे आत्मे या घराभोवतीच घुटमळणार. तेथेच घिरटया घालणार. या कारटयाला घालवा. म्हणजे सारे सुरळीत होईल, सुरक्षित होईल.’