‘चेंडू घेऊन गेला आहे. रडारड होऊन गेला आहे.’
‘कोणी रडवले त्याला?’
‘रघूनाथने मारले. त्याने वाटते त्याचा कॅरमचा खेळ उडविला. त्याने दिले तडाखे.’
‘तो कॅरमचा खेळ जाळून टाकतो.’
‘आम्ही खेळलो म्हणून तुमचे काय बिघडते?’ रघुनाथ एकदम येऊन म्हणाला.
‘तुला हे खेळ सुचतात. कोठे उद्योगधंदा कर म्हटले तर तेवढे मात्र होत नाही.’
‘तुम्ही शेतीवाडी भरपूर ठेवली आहे. कशाला करुन नोकरी? दुस-याची गुलामगिरी का चांगली?’
‘आणि घरी आयते खातोस हे का स्वातंत्र्य? इंग्रजांचे तर आपण सारेच गुलाम आहोत.’
‘ती गुलामगिरी मला दिसत नाही. परंतु तुम्ही घरात आम्हांला हसू-खेळू दिले नाही, तर मात्र ही घरची गुलामगिरी जाणवेल. बाबा, मीसुध्दा तुमचाच ना मुलगा?
‘अरे, कृष्णनाथ लहान आहे. तू मोठा झालास. तुझी काळजी तू घेशील. तुझी बायकोही आहे. बाळाला आमच्याशिवाय कोण? तू त्याला मारलेस ना? मला रात्रभर आता झोपही येणार नाही. हल्ली मला एकच चिंता सारखी जाळीत असते. बाळाचे पुढे कसे होणार?’
‘मी त्याचा सख्खा भाऊ आहे. मी का त्याचा शत्रू आहे? तुम्हांला असे वाटत असेल तर मी घर सोडून जातो. सारे घरदार, सारी इस्टेट याला ठेवा. माझ्यावर तुमचा विश्वास नसेल तर कशाला येथे राहू? कोठेही पोटाला मिळवीन.’
‘माझ्या माहेरी कमी नाही.’ रमा बोलली.
‘तुझ्या माहेरच्यांच्या जिवावर तरी कशाला जगू? जो आई-बापांच्या जिवावरही जगू इच्छित नाही, तो का बायकोच्या माहेरच्यांचा मिंधा होईल? बाबा सांगा, जाऊ सोडून घर?’
‘रघुनाथ, काय रे असे बोलतोस? अरे, तुम्ही दोघे माझ्याच पोटचे. तुझ्या पाठीवरची सारी देवाने नेली. एक हा कृष्णनाथ राहिला. लहान आहे म्हणून काळजी वाटते. तू त्याला प्रेम देत जा. आमच्या भावना ओळखून वागत जा. दुसरे काय? दोघे सुखाने राहा. कशाला कमी नाही पडणार.’