‘आई, माझा चेंडू सापडला का गं?’
‘सापडला का ग त्याचा चेंडू?’
‘मी नाही शोधले.’
‘तुला सांगितले होते की तेवढा चेंडू शोधून ठेव म्हणून; तर तेवढेही नाही ना झाले?’
‘मला का तेवढाच उद्योग होता?
‘कोणते होते उद्योग? त्या पोराचे एवढेसुध्दा तुम्हांला करायला नको असते. तो परक्याचा का आहे? थांब हो कृष्णनाथ, मी शोधून देते!’
‘आई, हा बघ मला सापडला. वैनीच्या ट्रंकेच्या मागे होता. वैनीनेच लपवून ठेवला असेल.’
‘मी कशाला लपवू? मला का खायचा आहे? वाटेल ते बोलायला वाटत नाही काही! हे सारे त्याने बोललेले चालते. आणि आमचे मात्र दिसते.’
‘आई, मी जातो.’
‘लवकर ये. फार रात्र नको करु.’
कृष्णनाथ खेळायला गेला.
घरात दिवे लागले. वैनीबाई स्वयंपाकाला लागल्या. सगुणाबाई झोपाळयावर बसल्या होत्या. स्तोत्र म्हणत होत्या. थोडया वेळाने त्यांचे यजमानही बाहेरुन आले.
‘थकलो बुवा. तू केव्हा आलीस? बरे होते का कीर्तन?’
‘बसा.’
श्रीधरपंतही झोपाळयावर बसले. दोघांची बोलणी चालली होती.
‘अजून बाळ नाही वाटते आला?’