‘नाही का झोप येत तुला?’
‘आई, देवघराची समई वा-याने गेली. तर दादा मला म्हणाला, तूच मालवली असशील. मी का मालवीन?’
‘परंतु तू आता तेथे कशाला गेला होतास?’
‘माझी आई लवकर बरी कर, असे देवाला सांगायला!’
‘अंधारात देवाची प्रार्थना करावी.’
‘म्हणून दिवा विझला वाटते? दादाने पुन्हा लावला, तर पुन्हा विझला.’
‘बाहेर फार जोराचा वारा आहे. त्यांचे कसे आहे? त्यांच्याजवळ जरा बसला होतास का? त्यांच्याजवळ जरा जाऊन बस व मग जाऊन झोप.’
कृष्णनाथ उठला; तो वडिलांच्या खोलीत गेला. तेथे दादा बसला होता.
‘दादा, मी बसू बाबांजवळ? तू आईजवळ बस.’
‘तुम्ही आता अंथरुणावर पडा. ऐका जरा सांगितलेले.’
‘आईच म्हणाली की जरा बाबांजवळ जाऊन बस म्हणून.’
‘बस येथे.’
‘बाबा-’
त्याचे बाबा वातात होते. त्याला कोण ओ देणार?
‘रघुनाथ, बाळाला तू सांभाळ हो. त्याचे सारे करा. मी आता जाणार. ते बघ, बोलावताहेत.’
‘बाबा, मी तुमचा कृष्णनाथ.’
‘कृष्णनाथ, कृष्णनाथ. किती गोड नाव! कृष्णनाथ खरेच गोड आहे. गोकुळअष्टमीला जन्मला. अशीच अंधारी रात्र. कडाड् कडाड् विजा करीत होत्या. मुसळधार पाऊस आणि बाळ जन्मला कृष्णनाथ.