‘खरेच बाबा, शारदाश्रमाचे चालक फार थोर! ते कर्मयोगी आहेत. संस्थेशी, सेवेशी त्यांनी लग्न लाविले आहे. कधी सुटी नाही, रजा नाही. समुद्राला का कधी सुटी असते? सूर्यनारायण रविवारी का घरी बसतो?’  असे ते म्हणायचे. त्यांची बहीण फार आजारी होती. तीन तारा आल्या. शेवटी गेली. बहिणीविषयी का त्यांना प्रेम नव्हते ? परंतु शंभर मुलांचा संसार त्यांनी मांडलेला. ते महान कर्तव्य सोडून त्यांना जाववेना. ज्यांची आई नाही अशा मुलांना त्यांचे वडील येथे आणून ठेवतात व म्हणतात, ‘शारदाश्रम म्हणजेच मुलांची आई!’ एकदा एक लक्षाधीश आपला छोटा मुलगा घेऊन तेथे आला नि म्हणाला, ‘माझा मुलगा आणला आहे. तुमची संस्था नि घर यांत फरक नाही. घरच्यापेक्षाही येथे अधिक आस्था आहे!’  ‘बाबा, अशा संस्था म्हणजे देशाची भूषणे आहेत, नाही?’

‘आणि कृष्णनाथ, तुझ्या त्या कृष्णाची सांग बाबांना गंमत’, विमल म्हणाली.

‘बाबा, तेथे कृष्णा म्हणून एक सेवक आहे. तो शारदाश्रमाच्या भोजनालयात असतो. संस्थेच्या आरंभापासून तो आहे. आज वीस वर्षे तो तेथे आहे. परंतु अद्याप पोळी त्याला नीट करता येत नाही! चटण्या-कोशिंबिरी करतो. सर्व सामान तो काढून देतो आणि रात्री तो सारी झाकाझाक करतो त्या वेळेस त्याची खरी मजा असते. झाकाझाक पाहता तो आपल्याशीच मोठयाने बोलतो, ‘उद्याचे तांदूळ निवडलेले आहे. खोब-याच्या वाटया २३ कशा? बरोबर. मागून दोन काढून दिल्या होत्या. डाळीच्या डब्यांना झाकणे लावली. केळयांची उद्या कोशिंबीर करुन टाकायलाहवी.’  असे बोलत त्याचे काम चालायचे. एकदा एक पाहुणे वरती झोपले होते. त्यांना वाटले की बोलतो कोण? ते उठून खाली आले तो कृष्णा कोठीघरात बोलत आहे! जेवताना मुले ‘कृष्णा पोळी,’ ‘कृष्णा भाजी, चटणी’ असा तगादा लावतात. कृष्णा चटणी वाढायला आणतो. ‘मी आधी पोळी मागितली, मी भाजी मागितली’, मुले म्हणतात. कृष्णा शांतपणे म्हणतो, ‘शेवटच्या मुलाचे मागणे माझ्या लक्षात राहते, बाकीच्या पहिल्या मागण्या मी विसरतो.’  मुले हसतात.

‘परंतु बाबा, कृष्णाचे संस्थेवर फार प्रेम. पाहुणे आले तर त्यांना अधिक तूप-ते पुरे म्हणेपर्यंत वाढील. त्यामुळे त्याच्या हातात तूप देत नाहीत. एखादी भाजी संपत आली म्हणजे तो पातेले खडखडवीत येतो. मुले म्हणतात, ‘कृष्णा’ समजले. भाजीचे दिवाळे ना तुझ्या?’  ताक करणे त्याचे काम. परंतु घट्ट ताक त्याला करता येत नाही; कृष्णाचे ताक म्हणजे पाणीदार असायचे. तोही विनोदाने म्हणतो, ‘पाणीदार आहे; परंतु चवदार आहे! कृष्णा प्रतिभावानही आहे. एकदा तो चहा करीत होता. पाण्याला आधण आले होते. परंतु तिकडे दूध उतू जाणार होते. आधी पूड टाकायची की आधी दूध उतरायचे, हा कृष्णाला प्रश्न पडला. आणि म्हणाला, ‘स्टेशनात एकदम दोन गाडया आल्या; परंतु स्टेशनमास्तर एक. कोणती गाडी आधी सोडायची?’‘असे कधी कधी विनोदी बोलतो. त्याला पाण्याचा फार नाद. सारखे पहिले पाणी ओतील, नवीन भरील आणि हातांत छडी घेऊन कुत्र्याला शिस्त लावील, ‘तेथे बस. मग तुला भाकरी मिळेल’ असे म्हणेल. असा हा कृष्णा. आमचे चालक म्हणायचे,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel