‘पण इथेच असा हां! नाही तर मला शोधावे लागेल.’
विमल त्या गर्दीत घुसली. माधवराव तेथे झाडाखाली उभे होते. तो त्यांना एक करुण दृश्य दिसले. एक मुलगा जवळच्या झाडाखाली रडत होता. मुलाला पाहून कोणालाही दया आली असती. माधवरावांच्याने राहवले नाही. ते त्या दु:खी मुलाकडे गेले व म्हणाले,
‘बाळ, का रे रडतोस?’
तो मुलगा त्या प्रेमळ शब्दांनी अधिकच विरघळला. त्याचे अश्रू थांबतना.
‘बाळ, का रडतोस? तू कुठला कोण? या सर्कशीतला का आहेस?’
‘हो.’
‘मग का रडतोस?’
‘ते मला मारतात. चाबकाने मारतात. जरा काम चुकले की रक्तबंबाळ करतात. मला नाही येत हे काम. मला यांनी पळवून आणले आहे. माझ्या दादाने मला विकले आहे!’
‘दादाने विकले?’
‘असे मॅनेजर म्हणतो. मला काही ठाऊक नाही.’
‘तुझा दादा कोठे असतो?’
‘तिकडे लांब सुरगावला. मला तुम्ही येथून सोडवता का? माझ्यावर पहारेकरी असतात. मला रडायची चोरी. येथे चोरासारखा येऊन रडत आहे. जरा संधी सापडली की मला तुम्ही न्या. माझे आईबाप बना!’
‘ती तेथे मोटार आहेना, तीत हळूच जाऊन बस जा.’
कृष्णनाथ पटकन गेला आणि त्या मोटारीत जाऊन बसला. लपून बसला.
‘विमल, चल आता. भूक नाही का लागली?’
‘तुम्हांला नाही बघायला आवडत; पण आम्हांला आवडते. तुम्ही मोटारीत बसा, बाबा. मी ते हत्ती पाहून येते हं!’