‘आपण तेथे असे निराधार गेलो तर खात्रीने घेतील. नाही तरी येथून जायला हवेच आहे. या गावात तर नाहीच राहायचे!’
‘मग लिलाव व्हायच्या आधीच जाऊ. भांडीकुंडीही विका. सामान विका. चार पैसे जवळ करा नि निघा! पुढे घराचे काही होवो!’
‘मला भूक लागली आहे.’
‘चला. मीही थांबले आहे.’
दोघांनी थोडीथोडी भाकर खाल्ली. बाकीचे पोट पाण्याने भरले. एके दिवशी सुरगाव सोडून खरेच रघुनाथ नि रमा निघाली. सोडताना त्यांचे डोळे भरुन आले. पूर्वीचे ते सारे वैभव डोळयांसमोर आले. आज त्या केवळ स्मृती होत्या. काही दिवस भावाकडे आम्ही सारी जात आहोत, असे रमाने शेजारी सांगितले होते. गाव सोडून कायमची सारी जात आहेत असे कोणाला वाटले नाही.
आगगाडीत मनस्वी गर्दी होती. रघुनाथ उभा होता. रमा उभी होती. तिच्या कडेवर चंपू होती. सिंधू, रमेश सामानावर बसली होती. चंपू रडू लागली. रघुनाथने तिला घेतले तरी राहिना.
‘तिला प्यायला हवे आहे. परंतु कसे पाजू तरी?’ रमा काकुळतीने म्हणाली. त्या बाकावरचा एक गृहस्थ उठला. त्याची माणूसकी जागी झाली.'
‘येथे बसा आणि मुलीला पाजा!’
‘उपकार आहेत बाबा!’ रघुनाथ म्हणाला.
पाजून झाल्यावर रमा उठली.
‘बसा, तुम्ही बसा. लेकराला निजवा!’ तो भला माणूस म्हणाला. दुनियेत अद्याप माणुसकी आहे. तिच्यामुळे जग टिकाव धरुन आहे.