‘कृष्णनाथ, सारी माझीच मुले. परंतु तुझ्यासारखी काही मुले चटका लावून जातात. जा बाळ. या संस्थेची आठवण ठेव! जेथे ज्या मैत्री जोडल्या असशील त्या टिकव. असे संबंध वाढविणे म्हणजेच मोठे होणे; आणि तुला एक सांगतो, सदैव वाढता राहा.
आमरण ख-या अर्थाने विद्यार्थीच राहा. महात्माजी येरवडा तुरुंगात १९२२ साली होते. तेथे ते मराठी शिकू लागले. १९३२ मध्ये काकासाहेब कालेलकरांजवळ तेथे ते ता-यांचा अभ्यास करु लागले. बाहेर कधी विश्रांतीसाठी कोठे ते राहिले तर तेथे उर्दू वाचतील, तामीळ शिकतील. महात्माजींचे अखंड विकासी जीवन बघ आणि नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन ज्ञान, नवीन नवीन विचार, नवीन नवीन मित्र, या जातीचे त्या जातीचे, अशा रीतीने तू वाढत राहा! जो असा सदैव वाढत जाईल त्याच्या आनंदाला तोटा नाही. वाढणे म्हणजेच खरे सुखी होणे. विकास म्हणजेच आनंद. तुला काय सांगू? पत्र पाठवीत जा. मधून मधून येत जा. शारदाश्रम तुझाच आहे. तुम्हा मुलांचाच आहे. जा बाळ! ये . तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. तुझे जीवन कृतार्थ होवो!’
निघाली मुले. मॅट्रिकच्या परीक्षेस जाणारी मुले. टांगे आले. तो पाहा प्रेमाचा टांगा. प्रेमाने कृष्णनाथाला हाक मारली. ज्याला त्याला प्रेमाचा टांगा हवा. आणि तो पाहा खाटकाचा धंदा करवेना म्हणून टांग्याचा धंदा करणा-या दयाळू मुसलमान बंधूचा टांगा. भरले सारे टांगे.
शारदाश्रमातील मुले, शिक्षक, चालक निरोप द्यायला रस्त्यावर आले होते.
निघाले टांगे. ‘आवजो, शिवापुरी खावजो!’ मुले म्हणाली.
समोर तिकडे समुद्र गर्जना करीत होता. मुले येतात, जातात, परंतु मी सर्वांचा साक्षी येथे सदैव आहे, असे जणू तो सांगत होता.