विमल नि कृष्णनाथ सुटून आली होती. बंद घर आज उघडले होते. दोघांनी घर झाडले, आरशासारखे स्वच्छ केले. दिवाणखान्यातील तसबिरी नीट पुसण्यात आल्या.
‘अंगण झाडायचे राहिले, विमल!’
‘आता कृष्णनाथ, मी दमले!’
‘तू बस. फुले फुललेली आहेत. पावसाळयात देवाघरचे पाणी मिळाले. फुलझाडे जिवंत राहिली. ही शेवंती बघ. लाख लाख फुलली आहे. तू हार कर. महात्माजींच्या, जवाहरलालजींच्या नि आझादांच्या तसबिरींना घाल.’
‘आईच्या नि बाबांच्या फोटोलाही सुंदर हार गुंफते.’
‘खरेच; मी विसरलो.’
‘तुम्हांला भारतमातेची आठवण आहे, भारतमातेच्या पोटात सर्वांची आठवण आली.'
‘मी अंगणी झाडतो. तुरुंगात आमच्या वस्तीचा मी स्वच्छता स्वयंसेवक झालो आहे. विमल, श्रमजीवनात एक प्रकारचा आनंद आहे, नाही?'
‘तो प्रमाणात असेल तर! मरेमरेतो ज्यांना काम करावे लागते, त्यांना कोठला आनंद? प्रमाणात सारी शोभा आहे. मी आणते फुले तोडून; गुंफते हार.’
‘मी जातो.’
विमल फुलांच्या ताटव्यांकडे गेली. सूर्यप्रकाश पडला होता आणि दंव पडले होते. सौम्य स्निग्ध अशी सृष्टी दिसत होती. गुलाबही फुलले होते. काही काही गुलाबांची फुले फारच रमणीय दिसत होती. किती सौंदर्य हे! आणि या झाडांच्या रोमरोमांत प्राणशक्ती तरी किती!
विमल विचार करीत उभी राहिली. फुले तोडणे दूरच राहिले.’