टांग्यात सामान ठेवण्यात आले. कृष्णनाथ छात्रालयात आला तो समुद्र त्याला दिसला. नारळाची डोलणारी डौलदार झाडे दिसली. जणू येणा-यांची स्वागते करण्यासाठीच ती येथे उभी होती. चालकांची भेट झाली.
‘सामान राहू दे येथे. आधी आता आंघोळ वगैरे कर. भूक लागली असेल; जेव जागरण झाले असेल. जरा नीज. मधल्या सुटीनंतर शाळेत नेईन. नाव घालीन, समजले ना? तो मुलगा शौचकूप दाखवील. सारे आटप.’
तेथे गरम पाणी होते. तोंड धुऊन कृष्णनाथने स्नान केले. तो जेवायला बसला. मुले वाढीत होती. त्याला आश्चर्य वाटले.
‘येथे का मुले वाढतात?’ त्याने विचारले.
‘हो. सात दिवसांच्या सात पाळया आहेत. त्यात सारी मुले विभागून देण्यात आली आहेत. एकेक तुकडीचा एकेक नायक असतो. लहान मोठी अशी सरमिसळ मुले असतात. त्या दिवशीच्या पाळीतील मुले सर्वांना वाढून, सर्वांचे जेवण झाले आहे असे पाहून मग जेवतात. आता उशीर झाला आहे. आम्ही जातो. पोटभर जेवा हं! तुमचे नाव काय?’
‘कृष्णनाथ.’
‘तुम्ही आमच्या खोलीत राहायला येणार आहात.’
‘तुमचे नाव काय?’
‘अशोक.’
‘सुंदर नाव- तरीच आनंदी आहात.’
‘मी जातो. घंटा झाली.’
कृष्णनाथ जेवला आणि तेथे एका खोलीत तो झोपला. त्याला जागरण झाले होते. परंतु फार वेळ त्याला झोप आली नाही. तो उठला. तेथे जवळच वाचनालय व ग्रंथालय होते. तेथेच शारदाश्रमाची प्रार्थनाही होत असे. तेथे सुंदर तसबिरी होत्या. कृष्णनाथ सारे पाहात होता आणि बाहेर समुद्राकडच्या व्हरांडयात येऊन तो उभा राहिला. भरतीची वेळ होती. फेस उधळीत समुद्राच्या लाटांवर लाटा येत होत्या! किती मौजा! त्या लाटांचा तो अपूर्व देखावा पाहून कृष्णनाथाने टाळया वाजविल्या.