पोलीस रघुनाथला घेऊन गेले.
रमाने माहेरी तार केली. परंतु कोणी आले नाही. सुरगावात कोणी जामीन राहीना. रमा त्या व्यापा-याच्या घरी जाऊन पाया पडली; परंतु व्यापारी म्हणाला, ‘आता माझ्या हातात काही नाही.’
शेवटी रघुनाथला सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. रमा रडत होती. तिचे दिवसही भरत आले होते. तिने भावाला पुन्हा तार केली. भाऊ आला व तिला माहेरी घेऊन गेला. या वेळेस तिला मुलगी झाली. आतापर्यंत सारे मुलगे झाले होते. ही मुलगी आता जगेल. यापुढची मुले जगतील, असा विचार तिच्या मनात आला. परंतु हा विचार मनात येताच डोळयांतून शतधारा सुटल्या. ‘माझी यापुढची बाळे जगली तर खातील काय? खायला तोटा नव्हता तेव्हा जगती तर ते अशा फंदांत पडते ना? मूल जगेना या निराशेनेच ते पापांकडे वळले. परंतु मी पापे पचवीन असे ना म्हणत? कोठे आहे तो माझा ताठा, तो अभिमान, तो दिराचा अपरंपार द्वेष?’ रमाला सारे जीवन डोळयांसमोर दिसू लागले. तिला का पश्चाताप झाला?
रघूनाथने जेलमधून एकही पत्र पाठविले नाही. तो तिथे रडत बसे. एके दिवशी जेलरचे व त्याचे बरेच बोलणे झाले. शेवटी त्याला ऑफिसात काम मिळाले. तो कैद्यांची कामे करी. त्यांची पत्रे लिही. सर्वांची त्याच्यावर भक्ती जडली. त्याला सारे रघुनाथबाबा म्हणत.
रमाच्या भावजया पुष्कळ वेळा टाकून बोलत. आईबाप नसले म्हणजे खरे माहेर कुठले? भाऊही एखादे वेळेस बोलत.
‘आता सुटेल नवरा. तिकडे नको का जायला? येथे किती दिवस मेले राहायचे? दुसरे भाऊ असते तर चारदिशी घालवून देते. परंतु आमच्या घरात सारा पोकळ कारभार!’ असे शब्द कानावर येत.
‘दादा, मी माझ्या सत्तेच्या घरी आज जाते!’ रमा म्हणाली.
‘सत्तेचे घर अद्याप शिल्लक आहे वाटते?’
‘उद्या घरही जायचेच आहे. परंतु अद्याप आहे.’
‘आणि उद्या गेल्यावर मग सत्तेचे घर कोठे?’
‘झाडाखाली, नदीकाठी, धरित्रीमाईच्या मांडीवर! दादा, पुन्हा तुमच्या घरी येणार नाही! बहिणीचा त्रास तुम्हांला होणार नाही!’
‘तारा करशील!
‘तारा करायला आता पैसे नाहीत. तशी चूक पुन्हा करणार नाही!’