गोष्टी होता होता मराठीचा तास संपला. शिक्षक गेले. मुले कृष्णनाथाच्या भोवती जमली. जणू कमळाभोवती भुंगे. आम्हांला दे रे ते गोण टिपून असे जो तो म्हणू लागला.
‘उद्या लवकर येऊन या फळयावर ती कविता मी लिहून ठेवीन. तुम्ही सर्वांनी ती मग उतरुन घ्या. चालेल?’
‘वा, छान युक्ती, हुशार आहेस तू!’
तो दुसरे शिक्षक आले. कृष्णनाथाची व त्यांचीही ओळख झाली आणि शेवटी खेळाचा तास आला. सारी मुले क्रीडांगणावर गेली. खोखोचा खेळ सुरु झाला. कृष्णनाथ विजेसारखा खेळत होता. किती चपळाई व सहजता! सारे पाहतच राहिले.
पहिल्याच दिवशी कृष्णनाथाचे नाव सर्वांच्या तोंडी झाले. शाळा संपली. कृष्णनाथाने आपले सामान अशोकच्या खोलीत नेले. खोली मोठी होती. पाच मुले त्या खोलीत होती. कृष्णनाथाने आपले सामान नीट लावले, तो प्रार्थनेची घंटा झाली. सर्व मुलांबरोबर कृष्णनाथ गेला.
‘वाढणा-या मुलांनी जावे.’ चालक म्हणाले.
ती मुले उठून गेली. तंबोरा वाजू लागला आणि गीतेचे श्लोक सुरु झाले. कृष्णनाथाने प्रार्थनची गंभीरता लहानपणीच अनुभवली होती. त्याला खूप आनंद झाला. प्रार्थना संपली. जेवणे झाली. चालक कृष्णनाथाकडे आले.
‘तुझे काही विषय कच्चे असले तर सांग म्हणजे छात्रालयांतील शिक्षकांकडून ते तयार करुन घेण्यात येतील. अद्याप फारसे पुढे गेलेले नाहीत: आणि तू हुशार आहेस. जे अडेल ते विचारीत जा. जे लागेल सवरेल ते मागत जा. कधी काही दुखू-खुपू लागले तर वेळीच सांगावे. आंघोळ स्वच्छ करावी. कपडे येथे हातांनी धुवावे लागतात. खरुज होऊ देऊ नको. येथे अनेक मुलांत राहावयाचे. एकाची खरुज दुस-याला होते. खरे ना? तू चांगला मुलगा आहेस. आज वर्गात तू कविता म्हणे फार चांगली म्हटलीस! तू ती कविता लिहून दे. सकाळी छात्रालयाच्या फलकावर आपण लावू.
चालक गेले. खोलीतील मुलांशी तो बोलत बसला. आजचा पहिला दिवस होता. अशोक व कृष्णनाथ मित्र झाले.
‘मला पत्र लिहायचे आहे. विसरलोच!’ कृष्णनाथ म्हणाला.
‘सकाळी लिही. आता झोपू. दमून आलेला आहेस.’ अशोक म्हणाला.
इतक्यात झोपायची घंटाही झाली. तेथे नियमित जीवन होते. विद्योपासकांचा खरोखरच तो आदर्श आश्रम होता. शारदाश्रम नाव उगीच नव्हते.