रघुनाथरावांच्या घरी आज केवढा सोहळा आहे! बाळाचे आज बारसे होते. पहिले बाळ. रमाला मुलगा झाला होता. आज त्याला पाळण्यात घालावयाचे होते. त्याचे नाव ठेवायचे होते. दुपारी मेजवानी झाली. आणि आता तिसरे प्रहरी सुवासिनी जमल्या होत्या. किती तरी बाळंतविडे आले होते. रमा पाटावर बसली होती. प्रसन्न हास्य तिच्या तोंडावर होते. तिची ओटी भरण्यात आली. मांडीवर बाळ होता.
तो पाहा रंगीत पाळणा. ती पाहा मऊमऊ चिमुकली गादी. गादीवर पांढरे स्वच्छ दुपटे. बाळाच्या अंगावर घालायला गरम सुंदर शाल, पाळण्यावर तो पाहा चांदवा. त्याला चिमण्या लावलेल्या आहेत. चिमण्यांच्या चोचीत लाल मोती आहेत! आणि दोन बाजूंनी दोन गुंजवळे आहेत! बाळाला पाळण्यात घालण्यात आले. पाळण्याची दोरी लांबवली गेली. त्या सर्व सुवासिनींनी दोरीला हात लावले आणि पुत्रवतींनी गोड सुरात पाळणे म्हटले. रमा आनंदाने ओथंबली होती.
नाव काय ठेवले बाळाचे? नाव अरुण ठेवले.
पेढे वाटण्यात आले. सुवासिनी घरोघर गेल्या आणि रघुनाथ आला.
‘शेवटी काय ठेवलेत नाव?’ त्याने विचारले.
‘तुमच्या आवडीचे.’
‘तुझ्या आवडीचे का नाही ठेवलेस?’
‘पुरुषांची इच्छा प्रमाण.’
‘अगं, अरुण नाव खरेच सुरेख आहे. आज घरात अरुणोदय केला. बाळाची परंपरा सुरु केली. अरुणाचा उदय झाला म्हणजे सर्वत्र आनंदीआनंद असतो. पांखरे उडू लागतात. झाडे डोलू लागतात. फुले फुलतात. मंद वारा वाहत असतो. सर्वांना जागृती येते, चैतन्य येते. तुला ती भूपाळी येते का?’
‘मला नाही भूपाळया येत.’
‘लहानपणी बाबा मला शिकवीत. गोपालकृषाला त्याची आई उठवीत आहे. ती म्हणत आहे:
‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.
उठि लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला.’