‘कृष्णा, तू नि मी एकदमच सेवानिवृत्त होऊ. माझ्या पाठीमागे तुला कोण सांभाळील?’ मुलांचे प्रेम कृष्णावर. माजी विद्यार्थी आले तर आधी कृष्णाची चौकशी करतील! प्रेमाचा टांगा नि हा कृष्णा, मुले कधी विसरणार नाहीत. आपल्या संस्थेची सर्वत्र कीर्ती जावी असे कृष्णाला वाटते. संस्थेशी तो एकरुप झालेला आहे. तो भाडोत्री नाही.’
‘कृष्णनाथ, तुला त्या शारदाश्रमात राहायला मिळाले. फार चांगले झाले. तुझ्यावर सुंदर संस्कार झाले. आता पुढे तू काय करणार?’
‘मला विज्ञानाचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. उद्याच्या हिंदुस्थानात शास्त्रज्ञानाची पदोपदी जरुर भासणार. भारताची पुनर्रचना करताना विज्ञानाची कास धरावी लागेल. आधी बी.एस्सी. होऊ दे. पुढे मग टेक्नॉलॉजीकडे जाईन.’
‘तुला परदेशात शिकायला जायचे असले तरी पाठवीन. ज्ञानाची हौस पुरी कर!’
‘तुमचे उपकार कुठे फेडू?’
‘उपकार कसचे! हे का मी उपकारबुध्दीने करीत आहे? तू जणू हक्कानेच या घरात शिरलास.’
‘आधी तुमच्या हृदयात शिरलो. माझ्या अश्रूंनी तुमचे हृदय उघडले; होय ना, बाबा?’
‘प्रभूला माहीत!’
‘बाबा, विमलला का नाही कोठे पाठवीत?’
‘ती माझ्याजवळ वाढू दे. आधी मॅट्रिकपर्यत तर जाऊ दे.’
‘कृष्णनाथ, मी दगड आहे हो! तुझी बुध्दी मला देतोस?’
‘रागावली. रुसली. कृष्णनाथ, तूच सांग. ही आता लहान का रे रुसायला, रागवायला?’
कृष्णनाथाने एकदम,
‘रडू नको रुसू नको
हस रे माझ्या मुला.’
हे चरणे म्हटले.