‘तर घरातून चालता हो. नीघ, ऊठ.’

दादाने मारीत मारीत बकोटी धरुन जिन्यातून त्याला ओढीत नेले आणि बाहेर घालवले. घराची दारे बंद!

रात्र झाली. रमावैनी व रघुनाथ दिवाणखान्यात कॅरम खेळत होती. कृष्णनाथ घराबाहेर रडत उभा होता. त्याला भीती वाटू लागली. तो तुळशीवृंदावनाजवळ जाऊन बसला. येथेच त्याची आई बसत असे. त्याला गोष्टी सांगत असे. कोठे आहे आई?

रमा झोपली; पण रघुनाथला झोप येईना. त्याचे मन त्याला खात होते. तो उठला. घराचे दार उघडले. तो शोधीत शोधीत मागील दारी आला. तेथे कृष्णनाथ होता.

‘चल घरात.’

कृष्णनाथ मुसमुसत घरात गेला.

‘नीज अंथरुण घालून!’

अन् कष्णनाथ उपाशी अंथरुणावर पडला! अरेरे!

कृष्णनाथ दिसायला सुंदर होता. मोहक मूर्ती, नाक सरळ व तरतरीत होते. डोळे काळेभोर, भुवया लांबरुंद. परंतु त्याची मूर्ती कृश व निस्तेज दिसू लागली. पोटभर खायला-प्यायलाही त्याला मिळत तसे. त्याची शाळा होती. स्वयंपाकीणबाई  वेळेवर करायच्या नाहीत. शिळे खाऊनच तो शाळेत जाई. दुपारी रात्रीचे उरलेले व संध्याकाळी दुपारचे उरलेले. दादांच्या पंक्तीला तो कधीच नसे. उरलेसुरले शिळेपाके त्याला मिळायचे. त्याचे कपडे फाटले होते. नवीन कोण शिवणार? आणि फाटलेले शिवून तरी कोण देणार? वैनी त्याला कामे सांगायची. भांडी घासायला लावायची. मारायची. दादा प्रेमाचा शब्दही बोलत नसे. शेजा-यापाजा-यांना कृष्णनाथाची कीव येई; परंतु कृष्णनाथ कधी कोणाकडे गेला नाही. त्याने कोणापुढे हात पसरला नाही. त्याला ना मित्र ना सोबती. खेळायला जायची बंदी होती. जणू तो तुरुंगात होता.

कृष्णनाथ मरावा असे रमावैनीला वाटत होते? ‘मेला मरत नाही एकदाचा’ असे त्या सदान्कदा म्हणायच्या. एकदा कृष्णनाथला ताप आला होता. ना औषध, ना काढा. दहा वर्षांचा बाळ अंथरुणावर तडफडत होता. परंतु त्यातून तो बरा झाला. रमावैनीस तो बरा झाला याचे का वाईट वाटले?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel