‘पण ही सारी मुले कुठे ठेवायची? तुम्ही निराश नका होऊ. माझा एक दागिना अजून शिल्लक आहे!’
‘नथ ना!’
‘हो, ती विका. काही दिवस ढकलू. सावकार काही एवढयात हाकलून देणार नाहीत. घ्या चंपूला. मी जाते!’
रमा दळायला गेली. रघूनाथ चंपूला खेळवीत बसला. नथ विकून जे पैसे आले ते पांचसहा महिने पुरले. परंतु पुन्हा पुढे काय, हा प्रश्न होताच.
त्या दिवशी सायंकाळी रघुनाथ एकटाच दूरवर फिरायला गेला होता. एका शांत ठिकाणी बसून राहिला. तो विचारांत मग्न होता. आज त्याला कृष्णनाथाची आठवण आली. त्याच्या डोळयांतून घळघळ अश्रू वाहत होते. आमची पापेच आम्हांला छळीत आहेत असे त्याला वाटले. इतक्यात पाचसहा खादीधारी तरुण वरच्या बाजूला येऊन बसले. ते हसत खेळत होते.
‘छान आहे ही जागा. समोर देखावा फार रम्य दिसतो!’
‘म्हणून तर तुला मुद्दाम येथे आणले. काय रे, तुरुंगातल्या सांग ना’
काही गंमती, आठवणी. सांग तेथले काही सत्याचे प्रयोग?’
‘सत्याचे प्रयोग या शब्दांत खोच आहे वाटते?’
‘ती खोच उगीच आहे का?’
‘अरे, शेकडो प्रकारचे लोक चळवळीत येतात. सर्वांना सांभाळायचे असते. चोरुन पत्रे पाठविणे, नातलग म्हणून इतरांच्या भेटी घेणे, असे प्रयोग करावे लागतात!’
‘अरे, जे आपल्या विचाराचे तेच आपले नातलग!’
‘गणू, मी तुरुंगात एक गोष्ट ऐकली. कोठल्या तरी एका तुरुंगात एक तरुण होता. तो मागे सुटला. त्याची पुष्कळ शेती होती. ती म्हणे त्याने शेतक-यांना देऊन टाकली. तोही शेतक-यांतच राहतो. पाच-पंचवीस कुटुंबे त्याच्या शेतावर राहतात. सर्वांची सारखी घरे. जे पिकेल ते सर्वांचे! मोठा अवलिया आहे म्हणतात!’
‘अवलिया म्हणजे बावळट!’
‘तू काही म्हण. परंतु असे ध्येयार्थी लोक असतात!’