‘नको ती आठवण. तू पाने वाढ जा. कृष्णनाथ, ठेव भरुन सारा खेळ.’
आज दोघे भाऊ अनंदाने जेवत होते. वैनीने आग्रह करुन श्रीखंड वाढले. कृष्णनाथाने श्लोक म्हटला. जेवणे झाली. दादा वर विडा खात होता.
‘दादा, आजच्या दिवशी मी खाल्ला तर चालेल?’
‘चालेल. मी करुन देतो, ये.’
‘चुना थोडा लाव; नाही तर तोंड भाजेल.’
‘खोबरे घालतो म्हणजे भाजणार नाही. चांगला रंगला पाहिजे ना?’
कृष्णनाथाने विडा खाल्ला. त्याचे ओठ रंगले. दादाला तो आपली जीभ दाखवित होता.
‘कशी रंगली आहे?’
‘पुणेरी जोडयासारखी!’
कृष्णनाथ बाहेर बागेत गेला. फुलपाखरांच्या पाठीमागून तो पळत होता. आज त्यालाही जणू पंख फुटले होते. नाचावे, बागडावे असे त्याला वाटत होते. मध्येच तो घरात जाई व किती वाजले ते बघे. तीन वाजता मोटार येणार होती. एकदाचे तीन वाजले. कृष्णनाथ तयारी करुन उभा होता. दादाही तयार होता.
आणि दारात मोटार आली. शेजारची पोरे धावली. रघुनाथ व कृष्णनाथ आले. दोघे भाऊ मोटारीत बसले. कृष्णनाथ पुढे बसला होता.
‘आली की नाही मोटार?’ तो शेजारच्या मुलांस म्हणाला.
‘केव्हा रे परत येणार?’ मुलांनी विचारले.
‘मी परत येणारच नाही. दूर दूर जाईन.’
रमावैनी दारात उभी होती आणि मोटार निघाली. पों पों करीत निघाली. सर्कशीचे सामान रेल्वेने पुढे गेले. मॅनेजरसाहेब मोटारीने जात होते. गावाबाहेर मोटार आली नि वेगाने चालली. दुतर्फा दाट झाडी होती. आणि ती माळण नदी आली. कृष्णनाथ पाहत होता. मधून मधून टाळया वाजवीत होता.