‘तो आता मोठा झाला आहे. निर्भय झाला आहे. मुळूमुळू रडणारा आता तो राहिला नाही. तो वाटेल तिथे जाईल व विजयी होईल! माधवराव म्हणाले.
मोटार खाली उभी होती. माधवराव व कृष्णनाथ तीत बसले. इंद्रपूरहून दहा मैलांवर स्टेशन होते. तेथे जाऊन आगगाडी पकडायची होती. निघाली मोटार. हां हां म्हणता स्टेशन आले. माधवरावांची नि स्टेशन मास्तरांची ओळख होती. माधवरावांनी दुस-या वर्गाचे तिकिट काढून दिले. नीट जागा पाहून दिली. गाडी कोठे बदलायची वगैरे त्याला समजावून सांगितले.
‘मी सारे करीन; तुम्ही काळजी नका करु.’ कृष्णनाथ म्हणाला.
‘तेथे पोचल्याबरोबर पत्र पाठव. आणि नीट व्यवस्था लागताच पुन्हा पत्र लिही. प्रकृतीस जप. तेथे समुद्र आहे. तुला पोहायला येते का नाही?’
‘नाही?’
‘तेथे पोहायला शीक. परंतु पाण्यात जरा जपून जा. अभ्यास झटून कर. सर्वांचा आवडता हो. छात्रालयाचे भूषण हो!’
‘मी प्रयत्न करीन.’
कृष्णनाथाने माधवरावांचे पाय धरले. त्याच्या डोळयांतून पाणी आले. माधवरावांनी वात्सल्याने त्याच्या पाठीवरुन हात फिरविला. गाडी सुटली!
जीवन कृतार्थ करण्यासाठी कृष्णनाथाच्या आयुष्याची गाडी सुरु झाली!