‘तुमच्या कुळाची लाज राखण्यासाठी मला लाज सोडावी लागत आहे व याला मारावे लागत आहे. याने रुपया चोरुन घेतला आहे. माझ्या डबीतला रुपया. म्हणे आईने दिला. इतके दिवस बरा तो राहिला? रुपया दे म्हटले तर देत नाही. आज रुपया चोरला, उद्या आणखी काही चोरील. तुमच्या आईबापांची, तुमच्या घराण्याची अब्रु जाईल. माझे मारणे दिसते; या लाडोबाचे करणे दिसत नाही.’
‘कृष्णनाथा, दे रुपया तो.’
‘दादा, तो माझा आहे. आईने एकदा मला दिला होता. या माझ्या लहान पेटीत तो होता. वैनी फराळाचे देईना. म्हणाली, दादाला सांग बाजारातून द्यायला. तेव्हा मला हा रुपया आठवला. मी वर येऊन तो हातात घेऊन बसलो होतो. मला आईची आठवण झाली. तो वैनी आली. माझ्या हातातला रुपया पडला. म्हणाली चोरलास. त्यांच्या खिशातला घेतला असशील. आता म्हणते वैनी की डबीतून घेतलास. वैनीच खोटारडी आहे.’
‘कोणाला खोटारडी म्हणतोस? जिभेला डाग देईन; नाही ठाऊक! सोडा त्याला. तू नी मी बरोबरीची का रे! मला खोटारडी म्हणतोस? उद्या तू यांनाही शिव्या देशील. सोडा त्याला!’
‘कृष्णनाथ, वैनीची क्षमा माग. तिच्या पाय पड; चुकलो म्हण. असे म्हणू नये मोठया माणसांना.’
‘मी नाही पाया पडणार. माझी चूक नाही.’
‘तुला ऐकायचे की नाही?’
‘दादा!’
‘आधी तिच्या पाया पड; चुकलो म्हण.’
‘मी देवीच्या पाया पडेन.’
‘तिच्या पड.’
‘मी नाही पडणार जा!’