‘वाटले की, आपल्या कृष्णनाथाला द्यावे सर्कशीत पाठवून. अशी लहान मुले मॅनेजरला लागतच असतील. कृष्णनाथ दिसायला सुंदर आहे. मॅनेजर मोठया आनंदाने घेईल. तुम्ही मॅनेजरला विचारा, आपल्याकडे त्यांना चहाला बोलवा आणि काढा गोष्ट. दुरुन कृष्णनाथ दिसेलच त्यांना. कशी आहे युक्ती?’
‘बरी आहे.’
‘यात धोका नाही. विष देणे नाही, विहिरीत ढकलणे नाही. तिकडे सर्कशीत काय वाटेल ते होवो; मरो-जगो, काही होवो.’
‘परंतु सज्ञान होऊन परत नाही का येणार वाटा मागायला?’
‘हा कोवळा पोर का तेथे वाचेल? तेथे चाबूक असतात. आणि पुढचे पुढे पाहू, तुम्ही माझे ऐकाच. हे माझे डोहाळे पुरवा.’
‘करु विचार.’
‘विचार नको. शुभस्य शीघ्रम्’
‘ही का शुभ गोष्ट?’
‘मग का अशुभ? माझ्या मुलाबाळांच्या कल्याणाची गोष्ट का अशुभ? वचन द्या की असे करतो म्हणून!’
‘हे घे वचन.’
रमा झोपली. परंतु रघुनाथला रात्रभर झोप आली नाही. उजाडले. रमा-रघुनाथ चहा पीत होती.
‘आज कृष्णनाथला देतेस का चहा?’
‘बोलवा त्याला. दोन दिवसांनी जायचा आहे कायमचा.’
‘कृष्णनाथ, अरे कृष्णनाथ-’
‘काय, दादा?’
‘चहा हवा का?’
‘नको.’