Bookstruck

आपण सारे भाऊ 32

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘दादा, दादा, ते पाहा पोपट, किती तरी पोपट!’

शेकडो पोपट खालच्या दरीतून एकदम वर आले. ते का त्या कृष्णनाथाला पाहायला आले होते? त्या लाल रस्त्याने ती काळी सावळी मोटार धावपळ करीत जात होती. जणू काळी सर्पीण फण फण करीत जात होती. रघुनाथने पाठीमागून कृष्णनाथाच्या पाठीवर हात ठेवला. त्याने दचकून मागे पाहिले.

‘दादा, तू हात ठेवलास?’

‘होय.’

‘आई असाच हात ठेवीत असे. मी तुझ्याजवळ येऊ बसायला?’

‘ये, असा वरुन ये.’
आणि कृष्णनाथ रघुनाथाच्या जवळ बसला. रघुनाथने प्रेमाने आपला हात त्याच्या पाठीवर ठेवला होत. मोटार भरधाव जात होती. तीस चाळीस मैल झाले असतील.

‘जरा थांबवता का मोटार?’  रघुनाथने विचारले.

‘थांबवतो हो. जरा थांबा. हे वळण जाऊ दे.’
मोटार थांबली. दादा खाली उतरला.

‘मी उतरु?’  कृष्णनाथाने विचारले.
मोटार एकदम निघाली आणि दादा खालीच राहिला.
‘दादा, माझा दादा!’  कृष्णनाथ रडू लागला.

‘दादा मागूनच्या मोटारीने येईल. रडू नको.’  मॅनेजर म्हणाला.
कृष्णनाथ कावराबावरा झाला. तो दादा, दादा करु लागला. तो रडू लागला. पाठीमागून येतो का बघे. दादा दिसतो का बघे. दादाचा पत्ता नाही.

‘थांबवा ना मोटार! दादा येऊ दे; मी उतरतो.’

‘येथे कोठे उतरतोस? दादा मागून येईल सांगितले ना? रडू नको; मी कोण आहे ते माहित आहे ना?

‘तुम्ही सर्कशीतले ना?’

« PreviousChapter ListNext »