पुण्यांतील असा हा सोन्यामारुति आहे तरी कसा याची वसंताला उत्सुकता वाटे. आपण सोन्यामारुति पाहून यावें असें त्याच्या मनांत येई. सोन्यामारुतीचा जंगी सत्याग्रह सुरू झाल्यापासून आणि विशेषत: तो खुनशी लाठीमार झाल्यापासून सोन्यामारुति सोन्यामारुति असा जणूं जप वसंता करूं लागला. सोन्यामारुतीचा सत्याग्रह! एका पक्षानें चालविलेला तो सत्याग्रह नव्हता. सार्‍या हिंदुसमाजानें तो चालविला होता. केवळ लोकशाही पक्षाचा तो नव्हता. तो हिंदुमहासभेचाहि नव्हता. तो कोणत्या तुटपुंज्या संस्थेचा नव्हता. सोन्यामारुतीचा सत्याग्रह मनांत असलें तरी का संकुचित पोतडीपुरता ठेवावयाचा ? नाहीं नाहीं. हा सर्वांचा सत्याग्रह आहे. सर्व हिंदूंचा हा सत्याग्रह आहे. ज्याला ज्याला वाटत असेल कीं मी हिंदु आहे, त्या सर्वांचा हा सत्याग्रह आहे. हिंदुमात्राला धर्मापेक्षां दुसरें काय प्रिय आहे ? अन्नमय प्राण असें इतर धर्माचे लोक म्हणोत, परंतु हिंदु म्हटला म्हणजे धर्ममय प्राण हेंच सूत्र डोळ्यांसमोर येतें.

वसंता तडफडूं लागला. त्याला खाणेंपिणें सुचेना, त्याला गाणेंबजावणें आवडेना, त्याला बोलपट बघवत ना. तिकडे पुण्याला सोन्यामारुति सत्याग्रह सुरू असतां आमच्या या धुळ्यांतील लोक खात पीत काय बसले ? या धुळ्याला हळदीकुंकूं कशीं साजरीं केलीं जातात ? टरबुजें, खरबुजें, आंब्याच्या डाळी यांचे गोड समारंभ कसे काय होतात ? सायंकाळी टिळक उद्यानाच्या बाजूला शेंकडो स्त्री-पुरुष फिरायला आलेले पाहून वसंता चकित होई. त्या लोकांकडे तो निरखून पाही. मिलमधील मजूर, घामट व डामरट तेथें त्याला दिसत नसत. ते बुध्दिहीन, घाणेरडे, धर्महीन, पोटापुरतें पाहणारे किडे, ते तेथें त्याला दिसत नसत. स्वच्छ पोषाख घातलेले, रुबाबदार, पांढरपेशे लोक त्याला दिसत. सनातन धर्माची जपमाळ ओढणारे हे लोक, येथें फिरायला कसे येतात ? कोणी चिवडा घेऊन खात, कोणी मिसळ घेत, कोणी चिरूट ओढीत; कोणी तपकीर कोंबीत, कोणी विडा चघळीत; सारे सनातन धर्माचे कट्टे अभिमानी! पुण्याला सोन्यामारुतीसमोर जाण्याऐवजीं हे येथें कसे ?

वसंताला वाटे कीं सोन्यामारुतीसंबंधीं त्यांच्या चर्चा असतील. आपण त्यांच्या चर्चा ऐकाव्या असें त्याच्या मनांत आलें. तो जरा एके ठिकाणी थांबला. सोन्यामारुति शब्द तेथें हवेंत उच्चारला गेला होता. वसंताच्या कानाला अमृतस्पर्श झाला. आहे, धुळे जिवंत आहे. धुळयांत मजुरांची धुळधाण झाली तरी धर्माची झाली नाहीं असें मनांत येऊन त्याला समाधान झालें. वसंता ऐकूं लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel