अशा या सोन्यामारुतींच्या समोर कोण येत आहे ? या जिवंत देवदेवतांची कोण पूजा करील ? या देवांजवळ दिवा नाहीं, या देवांच्या अंगावर वस्त्र नाहीं, या देवांना नैवेद्य नाहीं, या देवांभोंवतीं सारे उकिरडे आहेत, घाण आहे-असें जगाला जळजळींतपणें सांगण्यासाठीं कोण भेरी वाजवणार, कोण नगारे वाजवणार, कोण दुंदुभि घुमघुमवणार, कोण कर्णे वाजवील, कोण शंख फुंकील, कोण शिंगे त्राहाटील ? ह्या घंटा वाजवायला या. ह्या घंटा वाजवायला विरोध होईल. सरकार, सावकार, सनातनी-सारे एक होऊन या खर्या खुर्या सोन्यामारुतीच्या पूजेसाठीं जर कोणी घंटा वाजवून जगाला बोलावूं पाहील तर विरोध करतील. परंतु हे सारे विरोध अगस्ति ऋषींप्रमाणे तुम्हीं गिळून उरलें पाहिजे. अपमान, कष्ट, आपत्ति यांचे खारट कडूकडू समुद्रच्या समुद्र हंसत हंसत प्यायला तुम्हीं तयार झालें पाहिजे. वसंता! असेल नसेल तेवढी शक्ति एकवटून गर्जना करून लोकांना सांग ''बंधूंनो! इकडे या. सोन्यामारुति तिकडे लक्ष्मीरोंडवर नाहीं. तांबोळी मशिदीजवळ नाहीं. सोन्यामारुतीची मंदिरें गल्लींगल्लींत, रस्तोरस्ती, गांवोगांवी, शहरोशहरीं--जगभर आहेत, हे सोन्यामारुति तुमची वाट पाहात आहेत या. लौकर या. ह्या सोन्यामारुतींची अन्न, वस्त्र, ज्ञान वगैरे षोडशोपचारांनी पूजा करण्यासाठी या सारे धावत. जर न याल तर सोन्यामारुति एक दिवस संतापेल, प्रचंड हांक फोडील व सर्वांचें भस्म केल्याशिवाय राहणार नाहीं. सर्वांचें लंकादहन केल्याशिवाय राहणार नाहीं.'' वसंता! मी जातों. निर्मळ दृष्टि घे, निर्भय व नि:शंक वृत्ति घे, व ह्या अनन्त सोन्यामरुतींच्या सेवेसाठीं लाल झेंडा हातांत घेऊन आपल्या सर्व असेल नसेल त्या अंतर्बाह्य शक्तीनें सिध्द हो.
वसंता : वेदपुरुषा! तुझे अपार उपकार.
काय वानूं या मी संतांचे उपकार !
मज निरंतर जागवीती !
दुसरें मी काय म्हणूं ? प्राण देऊनहि तुझें ऋण फिटणार नाहीं. जन्मोजन्मीं हे प्राण तूं दाखवलेल्या ध्येयासाठीं अर्पंण करीत जाईन.
वेदपुरुष : अडीच हजार वर्षांपूर्वी जगताला ललामभूत झालेले भगवान् बुध्द म्हणाले ''एकाहि जीवाचे थोडे दु:ख दूर करतां येत असेल तर मी पांचशें वेळांहि जन्म घेईन, हरणार नाहीं, हटणार नाहीं, निराश होणार नाहीं.'' ते शब्द कधीं विसरूं नको व वाग. जातों. संघटना कर, सहकार्य कर, भ्रातृसंघ वाढव. आशेनें रहां. देव तुझें कल्याण करो !
वेदपुरुष गेला अदृश्य झाला. त्याचे शेवटचे थोर शब्द वातावरणांत घुमत होते. वसंता कोठें होता ? तो आजूबाजूला पाहूं लागला. त्याला समोर नदी दिसली. तिच्या तीरावर प्रेतें जळत होतीं. तो का स्मशानभूमींत होता ? वसंता घाबरला. परंतु पुन्हा निर्भयता आली. स्मशानांत तर शिवशंकर राहतो. शिवशंकर हा योगियांचा राणा! ज्ञान्यांचा मुकुटमणि म्हणजे शिव! मृत्युंजय शिव! मृत्यूच्या घरांत राहून तो मृत्युंजय आहे. वेदपुरुष येथेच अदृश्य झाला. तें शिवाचें का रूप होतें ? शिवस्वरूपी व सहस्त्ररूपी भगवंताचें का तें रूप होतें ?
वसंतानें वर पाहिलें. तिकडे घाट होता. घाटावर देवालय होतें. प्रचंड पाषाणमय मंदिर! अरे हा तर ओंकारेश्वर! हें पुणें कीं काय ? लोकमान्यांचें पुणें! सोन्यामारुतीच्या सत्याग्रहाचें पुणें !
परंतु कोठे आहे खरा सोन्यामारुति ? हा येथील सोन्यामारुति म्हणजे प्रतीक आहे. वेदपुरुषानें दाखवलेल्या कोट्यवधि सोन्यामारुतींच्या मंदिरांपुढें कोण येईल ? कोण तेथें डंका वाजवील ? मला मिळालेला संदेश मी देऊं शकेन का ? आहे का माझ्यांत शक्ति, आहे का तेज, आहे का निर्भयता, आहे का श्रध्दा, आहे का वीर्य, शौर्य, धैर्य ? वसंता मनांत म्हणूं लागला.