विठी : चल.
वसंता : चाललीं सारीं. वाघ्याहि चालला. ग्यानबा शिकला तर किती छान होईल ?
वेदपुरूष : त्याला कोण शिकविणार ? त्याची कोण दाद घेणार ? अरे' या महारा-मांगांत, भिल्ल-कातकर्यांत रत्नें पडली आहेत. परंतु सनातनी कोंबड्यांना त्यांची पारख नाहीं. या देवांची जर काळजी घेतली तर केवढी बहार होईल! यांच्यांतून व्यास-वाल्मीकि निर्माण होतील. यांच्यांत शक्ति आहे, सामर्थ्य आहे, कस आहे. परंतु मशागत करावयास कोण येणार ? तुळशीबागेंत तींच तीं प्रवचनें होत आहेत. परंतु तीं जर मांगवाड्यांत होतील तर ज्ञानगंगा वाहूं लागतील. येथें अनंत सामर्थ्याचे, अनंत गुणधर्माचे सोन्यामारूती आहेत. येथें उत्कृष्ट शिल्प करणारे नळनीळ आहेत. परंतु आज हीं रत्नें धुळीस मिळत आहेत. त्यांच्या हृदयाच्या हांका कोणालाहि ऐकूं येत नाहींत. सारे बधिर झाले आहेत. आणि आपल्या भावांच्या हृदयमंदिरांतील आत्म्याच्या घंटा ज्यांना ऐकायला येत नाहींत, तेच दगडी सोन्यामारूतींसमोर घंटा वाजवावयास जातात. समजलासना ?
वसंता : वेदपुरूषा! हिंडव, मला सर्वत्र हिंडव. या पावनमंगल सोन्यामारूतींच्या अनन्त मूर्ति मला दाखव. पायाखालीं तुडविल्या जाणार्या ज्ञानहीन, अन्नहीन अशा स्थितींत ठेवल्या जाणार्या या करूणगंभीर मूर्ति मला दाखव. चल, दुसरीकडे चल.