वसंता : मरूं दे त्यांना. आपण गांवांत जरा हिंडूं या. माझी आई वाट पहात असेल. मी आईकडून जेवून येतो.
वेदपुरुष : चल. तें तुझें घर.
वसंता : किती पटकन् आलें.
वेदपुरुष : तुझें पूर्वीचें रूप घे.
वसंता : खरेंच, ते मी विसरलोंच होतों, परंतु मीं आईला जरा भिवविलें असतें. वेदपुरुषा! थोडा वेळ अदृश्य होण्याची मला शक्ति देतोस ?
वेदपुरुष : तुझ्यावर मी प्रसन्न. आहें. जा.
आई : वसंता! कालपासून होतास कुठें ? मी म्हटलें, खरेंच गेलास कीं काय सत्याग्रहाला.
वसंता : मग नको का जायला ?
आई : अरे, दुनिया का ओस पडली सारी ? सारें पुणे गेलें वाटतें तुरुंगांत ? उगीच कांही तरी. आंघोळ वगैरे झाली वाटतें तुझी ? तेल लावलें आहेस वाटतें वासाचें ?
वसंता : आई! माझ्या अंगाला वास येत आहे बघ.
आई : खरेंच, किती गोड वास !
वसंता : आई! मी काल एका फुलाच्या कळींत निजलों होतों.
आई : कळींत रे कसा निजशील ?
वसंता : मी तुझ्या पोटांत लहान कसा होऊन बसलों होतो ? तसाच मी कळींत झालो.
आई : कांहीं तरी.
वसंता : तुला लहान होऊन दाखवूं ?
आई : दाखव.
वसंता : बघ, आई बघ. लहान लहान होत चाललों.