पहिला : अरे, सहासहा महिने ढेंकूण रक्त न पितां जगतात, संधि सांपडतांच पुढें येतात. मनांतील वासनाबीजें जरा दृष्टि मिळतांच, जरा स्मित दिसतांच जरा सहानुभूतीची चंचल हालचाल होतांच अंकुरित होतात. पुजारी एकीकडे कपाळाला भस्म लावीत होता, आणि आंत वासना त्याचें भस्म करीत होती! एकीकडे तो देवाची पूजा करीत होता, आणि एकीकडे ताईचें चिंतन करीत होता. भोगापुरतें चिंतन !

दुसरा : परंतु आपलीच चूक. ताईला आपण असें नसतें ठेवलें तर अशी पाळी येती का ?

पहिला : आतां काय उपाय ? माझ्यानें घरीं बसवेना. डॉक्टरांना मागे सांगितलें कीं, कांहीं औषध द्या ताईला. त्यांनीं देण्याचें नाकारलें. ते म्हणाले, '' हा गुन्हा आहे. असें औषध मीं दिलें तर मी फांशी जायचा! '' ताई! गरीब बिचारी ताई . एक दिवस मला म्हणाली, ''भाऊ! मला अफू आणून दे. मला मरुं दे.'' तिनें मला मिठी मारली होती. ती रडली. मी रडलों. आईच्या हट्टानें ताईची धुळधाण झाली! हा धर्म गांजतो आहे. भोगी लोकांचा लादालादी धर्म! विचारहीन, भावनाहीन, अनुकंपाहीन धर्म! आग लावा असल्या खोट्या धर्मांना !

दुसरा : चल घरीं जाऊं. ताई मोकळी झालीं असेल. पुढें काय करावयाचें ?

पहिला : आईनें कांहीं केलेंहि असेल. ह्या बायका फार धीट असतात! धरलें असेल नाक, दाबला असेल गळा, दाबलें असेल तोंड! अशा ह्या स्त्रिया साहसी असतात! धर्मरक्षणासाठीं हें साहस त्या करतात !

दुसरा : चल घरीं.

पहिला
: परंतु काय करायचें ? बाळ जर जिवंत असेल तर काय करायचें ?

दुसरा : रामापुढें नेऊन ठेवूं. रामाला काळजी.

पहिला : रामाच्या पायांजवळ ठेवूं तें बाळ. अनाथांचा नाथ तो पतितपावन तो. समाज ज्याला ज्याला दूर लकटील, तो तो देवाच्या घरीं जाऊन पोंचेंल.

दुसरा : दीन को दयालु दानी दूसरा न कोई ॥

पहिला : मग चलायचें घरीं ? हिंमत होत नाहीं. या डोहांत जीव द्यावा असें वाटत आहे.

दुसरा : डोह तुला बुडविणार नाहीं.

पहिला : खरेंच, मी उत्कृष्ट पोहणारा आहें. इच्छा नसतांहि तरंगत राहीन.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel