खंडू : दोन्ही मुलें तिच्याजवळच फुगून वर आलीं होतीं!

शिवराम : गंगाराम थोर मनाचा आहे.

बन्सी : रावणांना त्याची काय किंमत ? राम भेटेल तेव्हां सारें नीट होईल.

हरि : नुसतें चांगले असून भागत नाहीं. चांगल्याचीं संघटना व्हावी लागते. लाल झेंड्याखालीं एकत्र यावे लागतें.

खंडू : आणि होणारे हाल सहन करावे लागतात. ( गंगाराम येतो. )

शिवराम : ये, गंगाराम ये.

गंगाराम : निजा कीं आतां. पहांटे भोंग्याबरोबर उठायचें नाहीं वाटतें ? एक मिनिट उशीर झाला तर दंड होईल. सध्यांचा मॅनेजर म्हणजे कडकलक्ष्मीचा अवतार आहे.

बन्सी : लक्ष्मी नेहमीं कडकच असते.

गंगाराम : आपणहि गरिबांनीं कडक राहिलें पाहिजे. आपण मान वर करीत नाहीं म्हणून हे आपल्या उरावर बसतात. रहायला नीट जागा नाही, खायला नीट अन्न नाहीं, अंगभर वस्त्र नाहीं, आजारीपणांत औषध नाहीं, पगारी रजा नाहीं, पदोपदीं दंड, पदोपदी अपमान, उठतांबसतां लाथ, काडीचें स्वातंत्र्य नाहीं, अशी टोपी घालूं नको, अमक्या सभेला जाऊं नको, अमक्यालाच मत दे, तमक्याला दिलेंस तर बघ-काय ही अरेरावी ? याचा अंत केव्हां येणार ? बायका-पोरांकडे बघवत नाहीं, त्यांच्याजवळ दोन शब्द बोलायला फुरसत नाहीं; सण नाहीं; समारंभ नाही. कसें जगावें! तुम्ही सारे या लाल बावट्याखालीं कां नाहीं येत ? बलवान् होऊं या! संघटित होऊं या! मातींत पडलेले किडे उठूं देत! वानरांचे सोन्यामारुति होऊं देत.

खंडू : शिवराम! आपण सारेजण सभासद होऊं या.

शिवराम : नोकरी जायची रे.

गंगाराम
: सार्‍यांना का नोकरीवरून काढणार आहेत ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel