वसंता : परवां कोणा प्रोफेसरानें जवाहरलालजीचें चरित्र लिहिलें म्हणून त्यांना हांकलून देण्यांत आलें!

वेदपुरुष : त्या कोणत्याशा शाळेंतील मुलें रस्त्यावरील मिरवणुकींत सामील झालीं म्हणून चालकांनी शाळेंत त्यांना मरेमरेतों मारिलें. कांहीं शाळांत दंड झाले. कांहीं संस्थांनीं मुलांना काढून टाकलें.

वसंता : मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांस उद्देशून पत्रक काढणार्‍या निरपराध तरुणांची कांहीं संस्थांनीं खच्ची केली! ह्या शिक्षणसंस्था नाहींत. हीं थडगीं आहेत. मढीं मढींच निर्माण करणार! जीवनानें जीवन पटेल! मढ्यानें मढें तयार होईल !

वेदपुरुष : ह्या शिक्षणसंस्थांत ज्ञानाची धग नाहीं, ध्येयवादाची ऊब नाहीं, स्वाभिमानाचा किरण नाहीं, सहानुभूतीचा बिंदु नाहीं, मानसशास्त्राचें खरें दर्शन नाहीं, आसमंतांतल्या जगाचें भान नाही, उत्साह नाहीं, तेज नाहीं, प्रयोग नाहीं, प्रेम नाही, ओलावां नाही, आस्था नाहीं, उत्कटता नाहीं, कांहीं नाही! कांहीं नाहीं! या संस्थांतून एकच दिसेल! सरकारची व श्रीमंतांची हांजी हांजी करून पैसे मिळवायचे व दगडांवर दगड रचून टोलेजंग इमारती उभारावयाच्या! या टोलेजंग दगडांखालीं हजारों मुलांची जीवनें दडपलीं जातात! हजारों मुलांचे समुचित उत्साह, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांच्या प्रतिभा, त्यांच्या स्फूर्ति, सारें सारें उध्वस्त केलें जाते. मुलांचा स्वाभिमान संस्थांना सहन होत नाहीं. 

वसंता : एका मुलाच्या खिशांत राष्ट्राचा झेंडा सांपडला म्हणून म्हणे त्याला दहा रुपये दंड झाला !

वेदपुरुष : सरकार जुलूम करीत नाहीं, एवढा जुलूम या संस्था करीत असतात! एक प्रकारचाच नाहीं, हजारों प्रकारचा जुलूम असतो! विशेषत: लहान मुलांची फारच कींव येते. लहान मुलांना सर्वांत थोर शिक्षक हवा. जास्तींतजास्त विशाल दृष्टीचा व विशाल हृदयाचा शिक्षक अगदी लहानपणापासून हवा. परंतु आपापल्या जातींची तुणतुणीं वाजविणारे, आपापल्य शेंडयांचे व गंधांचे अभिमानी या लहान मुलांसमोर असतात. अत्यंत संकुचित वृत्तीचे, सनातनी दृष्टीचे, जड जरठ मतीचे शिक्षक लहान मुलांना मिळतात! दुर्दैव त्या मुलांचे.

वसंता
: कांहीं कांहीं संस्था तर केवळ जातीय असतात! शिक्षणसंस्था तरी जातीय नसाव्यात!

वेदपुरुष : त्या शिक्षणसंस्था नसून आपल्या जातीच्या लोकांना नोकर्‍या देणार्‍या संस्था असतात! शिक्षणाचें ध्येय तेथें नसतें, राष्ट्राची उभारणी हें ध्येय तेथें नसतें. आपापल्या जातींतील पढलेल्या निस्तेज उत्साहशून्य लोकांना पोटाला मिळावें म्हणून शाळा सुरू होतात! या संस्थेत कोंकणस्थांनाच नोकरी, या संस्थेंत देशस्थांना, या संस्थेंत क-हाड्यांना, या संस्थेंत मराठ्यांना, या संस्थेंत प्रभूंना-काय आहे सारी घाण ! तोंडानें सहनाववतु म्हणतात व डबकीं करून राहतात! ज्याच्या ज्याच्याबद्दल दुजाभाव वाटतो, त्याला त्याला जवळ घेऊन हा सहनाववतु मंत्र म्हणावयाचा असतो. केवळ आपापल्या जाती, आपापलीं नातीं-गोतीं जवळ करून म्हणावयाचा नसतो. परंतु आहे कोठें विचार ? सारा विकारांचा पसारा आहे!

वसंता : चला. आपण कांही संस्थातून डोकावूं या.

वेदपुरुष : चल. त्या मोठ्या संस्थेंत चल. थोरामोठ्यांनी ती संस्था स्थापन केली होती.

वसंता : त्या झाडाखालीं ती मुलें काय बोलत आहेत ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel