वसंता : शाळेंतील मास्तर कसे आहेत ?
म्हातारा : तेहि तसेच आहेत. झेंड्याबरोबर जाईल त्याला शाळेंतून हाकलीन, असें ते म्हणतात.
वेदपुरुष : जिकडून तिकडून दडपेगिरी आहे !
वसंता : ही पायमल्ली केव्हां थांबणार ?
वेदपुरुष : तुम्ही तरुण उठाल तेव्हां.
म्हातारा :फार जुलूम दादा. कोंडवाड्याचा जुलूम तर विचारूं नका. पाटलाला सूड उगवतां येतो. शेतकर्याजवळ विष खायला दिडकी नसते, आणि दोनदोन रुपये कोंडवाडे भरावे लागतात. कोंडवाड्यांत ना ढोरांना चारा ना पाणी !
वसंता : आतां तुमचें स्टेशन येईल. तुमची आम्हांला आठवण राहील.
म्हातारा : तुझीहि मुला मला आठवण राहील.
वसंता : तुम्ही खालीं उतरा; मी हातांत गाठोडें देतों. म्हातारा गेला. गाडी पुन्हा सुरू झाली.
वेदपुरुष : कशी आहे सोन्यामारुतींची स्थिती! सर्व बाजूंनी जसे वेढले गेले आहेत. कृष्णाच्या मूर्तीला कालियानें शेंकडों वेढे दिले आहेत.
वसंता : कृष्ण आपले आंग फुगवील! हा बाळकृष्ण बलवान होईल. कालियाचे वेढे तटातट तुटतील, कृष्ण मुक्त होईल.
वेदपुरुष : कृषि करणारा तो कृष्ण. हा गोपाळ कृष्ण लौकर मुक्त होवो. भारतवर्षात आनंद येवो. मुरलीचें संगीत येवो.
वकीलसाहेब : शेटजी! सोन्यामारुतीचा सत्याग्रह जोरांत आहे बरें का!
व्यापारी : ( एकदम उठून ) धर्मांचे रक्षण झालेंच पाहिजे.
वकीलसाहेब : हे मुसलमान बाकी फार शेफारले. हिंदूंच्या डोक्यावर ते बसत आहेत.
वसंता : आणि हिंदु हिंदुंच्या डोक्यावर नाहीं का बसत ? हिंदु सावकार हिंदु कुळाला का सोडील ? हिंदु कारखानदार हिंदु मजुराला का अधिक मजुरी देईल ? हरिजाना कुत्र्याप्रमाणें नाहीं वागवीत ? आपणहि आपल्या भावांच्या डोक्यांवर बसत आहोंत. शेंकडों वर्षे बसत आलों आहोंत. त्यांना लाथा मारीत आलों आहोंत.
व्यापारी : तुम्ही गांधींपैकीं दिसतां ? तुम्हांला धर्म वगैरे कांहीं नाहीं.
वकील : या गांधीचाच प्रताप आम्हाला भोंवतो आहे. गांधी म्हणजे हिंदुधर्माचा सत्यनाश करणारा राक्षस आहे.