खेड्यांतील लोक तुम्हांला पोसतात. तुम्ही त्यांना काय देत आहांत ? ते तुम्हांला धान्य देतात, तुम्ही त्यांना विचार द्या. ते तुमचीं शरीरें पोसतात, तुम्ही त्यांचीं मनें पोसा. विचाराचीं, तेजस्वी नवविचारांचीं कणसें त्यांच्या घरीं नेऊन द्या. धर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, जगांत काय चाललें आहे, आपण काय करायला हवें, तें त्यांना समजावून सांगा.

वसंता : परंतु हें काम कोणीं करायचें ?

वेदपुरुष : तुम्हीं तरुणांनीं. तुम्ही अभ्यासमंडळें काढा; रात्रंदिवस श्रम करुन भरपूर विचार मिळवा. निश्चित विचार जवळ करा. आणि ते विचार गांवोगांव पेरीत चला. बहुंजनसमाजाच्या मनोभूमि तापलेल्या आहेत. आतां विचारांचा पाऊस पडूं दे. विचारांजवळ जाणें म्हणजे पुनर्जन्म होणें. मुंज झाली, गायत्री मंत्र राष्ट्राला द्या. राष्ट्राची मुंज लावा. ज्या राष्ट्राची मुंज होत नाहीं, त्या राष्ट्राला नवजन्म नाहीं. पक्ष्याला दिवज म्हणतात! अंड्याची कवची फोडून पक्षी बाहेर येतो, आणि निळ्या नभांत उडूं लागतो, हिरव्या झाडांवर बसूं लागतो. तो त्याचा पुनर्जन्म असतो. राष्ट्रहि जुन्या विचारांच्या कठीण कवच्या फोडून द्विज झालें पाहिजे. स्वच्छ विचारांच्या वातावरणांत उंच उडत गेलें पाहिजे. निर्मळ सतेज भावनांच्या फांद्यांवर नाचत बसलें पाहिजे. बहुजनसमाजाला द्विजत्व द्या. आज राष्ट्रांत कोणीहि द्विज नाहीं. राष्ट्राचा पुनर्जन्म नाहीं, राष्ट्रास नवीन दृष्टि नाहीं. हजारों वर्षे एकाच स्थितींत राहिलों. तें कवच आतां गळूं दे, पडूं दे. पक्षी मुक्त होऊं देत. वसंता! या नवीन उपनयनांचे आचार्यत्व तुमच्याकडे येत आहे. या उपनयनाला दर्भ नकोत, समिधा नकोत. नवीन उपनयनांचीं नवीन चिन्हे. रक्तध्वज हातांत घ्या! या रक्तध्वजांत दर्भ आले, समिधा आल्या. दर्भ म्हणजे काय ? दर्भ जास्त टोचतो, आंत घुसतो, त्याप्रमाणे बुध्दि पाहिजे! कुशाग्र बुध्दि म्हणतात! कुशाच्या अग्राप्रमाणें, दर्भाच्या टोंकाप्रमाणे बुध्दि पाहिजे! कोणत्याहि विषयांत ती घुसली पाहिजे. बुध्दिला भय नको भीति नको. साम्यवाद असो कीं साम्राज्यवाद असो. बुध्दि घुसवा आंत. आणि समिधा म्हणजे काय ? तीव्र व प्रखर बुध्दीनें जो विचार सत्य वाटेल, त्या विचारासाठीं जीवनाची आहुति देणें, आपल्या पंचप्राणांच्या समिधा होणें. हा त्याचा अर्थ आहे. मौजीबंधनांत महान काव्य आहे. लंगोटी लावणें याचा अर्थ काय ? तुला ज्ञानाची उपासना करा. वयाची असेल, तर संयम राखला पाहिजे, इंद्रियें इकडे तिकडे भडकूं देतां कामा नये. यज्ञोपवीत म्हणजे काय ? कर्म, ज्ञान व भक्ति हा त्या तीन पदरांचा अर्थ होय. तीन पदरांच्या गांठीला बह्मगांठ म्हणतात. द्विज होणें म्हणजे प्रत्येक कर्म ज्ञानपूर्वक, विचारपूर्वक करणे ; प्रत्येक कर्मांत भक्ति ओतणे, जिव्हाळा ओतणें. अशीं कर्मे करीत गेल्यानें ब्रह्माची गांठ पडतें. ध्येयाची गांठ पडते.

वसंता! तुम्हांला ध्येयाची गांठ पडावी अशी जर तळमळ असेल तर ह्याप्रमाणें वागा. विचार, तळमळ व कृति हीं जीवनात आणा. सर्व राष्ट्राच्या जीवनांत आण. पेटवा होम. महान् होम! आपल्या संस्कृतींत प्रत्येक प्रसंगीं होम सांगितला आहे. याचा अर्थ हा कीं, कोणतेंहि कर्म अंगावर घ्या. तें तडीस नेण्यासाठीं तुम्हांला होम करावा लागेल. त्याग करावा लागेल. होमांत मला फार अर्थ भरलेला दिसतो! हिंदु संस्कृति म्हणजे होम! महान् वस्तूंसाठीं क्षुद्र वस्तूंचा होम !

वसंता
: जगांत नवीन ध्येयें आलीं कीं नवीन प्रतीकें निर्माण होतात. त्या त्या काळांतील महान् पुरुष नवीन दृष्टि देतो व ती दृष्टि खिळविण्यासाठीं नवीन चिन्हें निर्मितो. साम्यवादानें हातोडा कोयता हें चिन्ह निर्माण केलें. जगांतीन सार्‍या श्रमजीवी जनतेचें ऐक्य चिन्ह आहे. जगांत श्रमाला महत्त्व आहे. श्रमणार्‍याला आधीं स्थान, आधीं मान !

वेदपुरुष : वसंता! अरे मारुति म्हणजे मानवी आत्मा! मारुति चिरंजीव आहे. मारुति पुन:पुन्हा उडी मारतो. राम आणि मारुति! एकदांच नाहीं ते झाले. ते नेहमीं जन्मत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel