वसंता : असले सडलेले आंबे खाऊन, हे उकिरड्यावरचे तुकडे खाऊन, हीं मुलें आजारी नाहीं का पडणार !

वेदपुरुष : कुत्रें उकिरड्यावर चांगलें पोसलें जातें. कुत्र्याला घरांतील स्वच्छ पोळी मानवत नाहीं. कुत्र्याला उकिरड्यावर फेकलेला चजकोर अधिक मानवतो! हे आपण फेंकलेले सडलेले आंबे सार्थकीं लागत आहेत असें मनांत येऊन तें महिम्न म्हणणार्‍या पुरुषाला किती कृतर्थता वाटत आहे, केवढी धन्यता वाटत आहे! आपल्या नांवावर चित्रगुप्ताच्या चोपडींत आज दानधर्मांचे पुण्य लिहिलें जाईल असें त्यांना वाटत आहे !

वसंता : अशीं गोरगरिबांचीं, भिकार्‍यांचीं मुलेंबाळें कितीतरी आजारी पडत असतील, रस्त्यांत मरत असतील! जगाला त्याची दाद असेल का ?

वेदपुरुष : मेलेल्यांची नोंद ठेवावी लागते. असे रस्त्यावरचे मरणोन्मुख जीव सार्वजनिक रुग्णालयांत पाठविण्यांत येतात. तेथें ते पुरे मेले म्हणजे त्यांचे मुडदे श्रीमंत विद्यार्थ्यांना शारीरविज्ञान मिळावें म्हणून उपयोगी पडतात.

वसंता : गरींब जिवंतपणीं तर समाजासाठी श्रमतोच, परंतु त्याचा मृत देहहि समाजाला ज्ञान मिळावें म्हणून सार्थकीं लागतो !

वेदपुरुष : गरिबांची दवाखान्यांत कशी व्यवस्था असते, कशी उत्कृष्ट व्यवस्था असते, तें तूं पाहिलें आहेस का ?

वसंता : मी कोठून पाहणार ?

वेदपुरुष : चल, त्या उंच दवाखान्यांत जरा जाऊं. फार प्रसिध्द आहे तो दवाखाना. लाखों रुपयांचा फंड आहे.

वसंता : केवढें विस्तृत आवार, किती विशाल बागा! रोग्यांना फुलें देत असतील त्यांची मनें प्रसन्न ठेवण्यांत येत असतील नाहीं ?

वेदपुरुष : फुलें हीं देवाला मिळत असतात! या दवाखान्यांत जे बडेबडे डॉक्टर आहेत, त्यांच्या टेबलांवर सुंदर फुलांचे गुच्छ ठेवण्यांत येत असतात. त्यांच्या घरीं त्यांच्या मंडळींना सुन्दर केशकलापांत खोंवण्यासाठी पाठविण्यांत येत असतात. रोग्याला फुले! वेडा आहेस तूं. हा धर्मार्थ दवाखाना आहे. येथें रोग्याला शिव्या मिळत असतात.

वसंता : परंतु कांही रोग्यांची खास व्यवस्था होत असेल, नाहीं !

वेदपुरुष
: समाजाला भूषण असणारे संस्थानिक, जमीनदार, श्रीमंत, व्यापारी वगैरेंची नीट व्यवस्था येथें ठेवण्यांत येते. अधिकाराप्रमाणें मान दिला पाहिजें, व्यवस्था ठेवली पाहिजे. श्रीमंताच्या कुत्र्याला गादी द्यावी लागेल. परंतु भिकार्‍याला दारांतच उभें करणें रास्त असतें !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel