पहिला : बरोबर आहे त्यांचे म्हणणे. संसाराची जबाबदारी पार न पाडणार्‍याला मुलगी देणें म्हणजे अधर्मच तो !

दुसरा : चला आतां जाऊ. बरीच रात्र झाली वाटतें ?

पहिला : आठहि अजून नाहीं झाले. दिवे बारीक झाले होते का ?

दुसरा : लक्षांत नाहीं बोवा. धर्माच्या चर्चेत वेळेचें भान राहिलें नाहीं. 

पहिला : तपकीर घ्या. कडक नाहीं. मी थेट मद्रासकडची मागवतो. महाराष्ट्रांत तपकीरसुध्दां नीट होत नाहीं.

दुसरा
: बावळट आहे महाराष्ट्र. उपाशी राहील, परंतु ऐट मिरवील. पुण्याला विद्यार्थ्यांच्या खानावळी सार्‍या कानडी लोकांनी येऊन काढिल्या आहेत. आपल्या पक्षाच्या लोकांचें तिकडे लक्षच जात नाही.

पहिला
: आपल्या लोकांचें धर्माकडे लक्ष असतें. पोट नंतर. धर्म आधीं. चला.

ते दोघे गृहस्थ उठले. त्यांनीं आपापलीं उपरणीं झटकलीं. तपकिरीमुळें शिंका फटाफट आल्या. उपरण्याच्या एका टोकानें नाकें स्वच्छ करण्यांत आलीं. दुसर्‍या टोकानें दोघांनीं आपल्या आरश्या स्वच्छ केल्या.

वसंता त्यांच्याकडे पाहात होता. त्यांच्या बोलण्याचा अर्थ वसंताला समजला नाहीं. सोन्यामारुतीसमोरचा सत्याग्रह म्हणजे गंमत आहे कीं गंभीर प्रश्न आहे ? तेथें सारा महाराष्ट्र, सारा हिंदुस्थान लोटणार कीं कांहीं शिष्ट प्रतिष्ठेच्या पूजेसाठीं व स्वार्थीं हेतूसाठीं जाणार ? हें काँग्रेस मारण्याचें कुटिल कारस्थान आहे कीं खरोखर हृदयाच्या आंतल्या भागांतील ही दैवी प्रेरणा आहे ? ही फसवणूक आहे कीं हा प्रामाणिकपणा आहे ? ही मुत्सद्देगिरी आहे कीं शुध्द धर्मप्रेम आहे ? हा डावपेच आहे का भक्तिभाव आहे ? येथें प्रेम आहे कीं द्वेष आहे ? काय हें गौडबंगाल ?

त्या म्हातार्‍यांचा वसंताला तिटकारा आला. त्यांच्या बोलण्यांत त्याला स्वार्थापलीकडे कांहीं दिसलें नाहीं. मोलकरणीच्या पोराला स्वाभिमान नाहीं आणि साहेबासमोर नंदीबैल सजून जाणारा बापू स्वाभिमानी कसा ? बापूला तारेनें बोलावणारा का धर्माभिमानी म्हणावयाचा ? पुण्यास सत्याग्रह आहे म्हणून न जाणारे का धर्मप्रेमी ? हा धर्म कीं हा दंभ ? ही तोंडपाटीलकी कीं ही पोटतिडीक ? ही श्रध्दा कीं ही बडबड ? ही चळवळ कीं गांडुळांची वळवळ ? काय आहे हें सारें ?

वसंता पुढें चालला. जो जो कोणी भेटेल, त्याच्याकडे तो तिरस्कारानें पाही. कोणाच्या सिनेमाच्या गप्पा, कोणाच्या रेडियोच्या गप्पा, कोणाच्या लग्नासंबंधी, कोणाच्या परीक्षेविषयीं, कोणाच्या नोकरीबद्दल, कोणाच्या मेजवानीबद्दल! त्या गप्पा वसंताच्या कानांवर पडत होत्या. सोन्यामारुति कोणाच्याच संभाषणांत फारसा डोकावला नाहीं. जेथें कधीं सोन्यामारुति उच्चारला जाई, तेथेंहि थट्टेच्या स्वरांत. ना तळमळ, ना जळफळाट! सारे आइस्क्रीमसारखे थंड, नदीकांठच्या गार होणार्‍या वाळवंटासारखे थंड !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel