वसंता : येथेंहि श्रीमंत गरीब भेद आहेत !

वेदपुरुष : समाजरचनेचें प्रतिबिंब सर्व संस्थांतून पडत असतें. तुम्हीं हिंदूंनीं देवांतसुध्दां जाति वर्ण निर्माण केले आहेत. वरुण हा विप्र, इंद्र हा क्षात्र, पुषन् हा वैश्य! असले भेदाभेद घेऊन आपण सर्वत्र जात असतों! जेथें तेथें स्वत:चें प्रतिबिंब आपण पाहतों. आज भारतात जी घाण आहे ती तुमच्या हदयाचें प्रतिबिंब आहे, तुमच्या संस्कृतीचें तें अपत्य आहे !

वसंता : खाणें आलें रोग्यांचे! काय आहे तें वाटींत ?

वेदपुरुष : तो साबूदाणा आहे. कसा लचका गचका दिसतो आहे.

वसंता
: असा काय दिसतो ? त्यांत दूध नाहीं वाटतें ?

वेदपुरुष : पाण्यांतच तो शिजवतात, नांवाला थोडें दूध घालतात.

वसंता : सार्वजनिक संस्था श्रीमंत नसतात !

वेदपुरुष
: येथें तसें नाहीं. या संस्थेजवळ प्रचंड फंड आहेत. भरपूर दूध येथें येतें. परंतु तें रोग्यांकडे न जातां रोग्यांना बरें करणार्‍या  प्रभूंकडे जात असतें. आणि शिवाय या भिका-यांच्या कोठ्याला दुधातुपाची संवय आहे कोठें ? कोरड्या भाकरीची ज्यांना सदैव संवय, त्यांना हा पाण्यातंलाच गोड साबुदाणा म्हणजे अमृत आहे.

वसंता : सर्वांकडे जातां जातां जें दूध उरेल तें रोग्यांना भरपूर होत असेल! हिशोबांत तें मणावेरी धरण्यांत येत असेल! रोग्यांसाठीं किती तरी दूध अहवालांत असेल. परंतु ओठांत मात्र जात नाहीं, पोटांत शिरत नाही. हरहर !

वेदपुरुष : सर्वत्र हीच त-हा. तुरुंगांत कैद्यांना भाजीसाठीं इतके कंद द्यावे असें ठरलेलें आहे. परंतु कंद कैद्यांच्या देवाकडे जातात व किडलेला पाला, जून झालेलें भेंडें, पिवळीं झालेलीं वांगीं, सडूं लागणारे कांदे कैद्यांच्या थाळींत येतात.

वसंता : यासाठी भांडले पाहिजे. तक्रार केली पाहिजे.

वेदपुरुष : तक्रार कोणाकडे करावी ? ती रशियन लेखक पुष्किन् यानें लिहिलेली छोटी गोष्ट तुला माहीत आहे का ?

वसंता : कोणती बरे ? कोण ग्रंथकार, पुष्किन् ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel