पहाटेची कोकिळा ओरडली, ''होय. आहे तुझ्यांत श्रध्दा.'' कोकिळा सांगत आहे असें त्याला वाटलें. वसंता तेथें घाटावर बसला. आकाशगंगेंत स्नानें करून निवालेल्या सप्तर्षीकडे तो पहात होता. ध्रुवाला प्रदक्षिणा घालणारे सप्तर्षि! लहान बाळ ध्रुव! परंतु सत्याचा, तपस्येचा, निश्चयाचा तो महामेरु होता. महर्षि त्याच्याभोंवतीं प्रदक्षिणा घालूं लागले. नवीन तरुण जर नवध्येयानें पेटतील, निश्चयानें नटतील, त्यागाने शोभतील, अविरत अखंड श्रध्देनें झिजतील तर सारे लोक, म्हातारे म्हातारे पुढारीहि-त्यांच्याभोंवतीं प्रदक्षिणा चालूं लागतील. बाळ ध्रुवाचा विजय असो! युवकाचा विजय असो !

वसंता पहात राहिला. त्याच्या शेजारी येऊन कोण उभें राहिलें आहे ? वसंताचें लक्ष नव्हतें. आकाशांतील ध्रुवाकडे त्याचें लक्ष होतें. परंतु एकदम त्यानें वळून पाहिलें. दोघे एकमेकांकडे पाहात राहिले.

वसंतानें हांक मारली ''भाऊ !''

भाऊ म्हणाला ''काय ?''

''काय ? तूं खरेंच माझा भाऊ आहेस ?'' वसंताने विचारलें.

''होय. मी भाऊ आहें'' -तो म्हणाला.

''एकोणीसशें सतरांतील तुझा जन्म -'' वसंतानें विचारलें.

''हो. ''- तो आश्चर्यानें म्हणाला.

वसंता या तरुणाकडे सारखा टक लावून पाहूं लागलां. शेवटीं तो एकदम उठला व त्यानें त्या तरुणाला मिठी मारली व ''भाऊ भाऊ! वीस वर्षांनीं माझा भाऊ पुन्हा भेटला'' असें तो वेंडयासारखें बोलूं लागला. तो तरुण बुचकळ्यांत पडला.

''असें काय करतां ?'' त्यानें विचारलें.

''तूं माझा भाऊ. १९१६ च्या सप्टेंबर महिन्यांत माझा भाऊ पुण्यास प्लेंगने मेला. त्याला लहानपणापासून मीं वाढवलें होतें. आई आजारी असे. मीं त्याच्यावर अपार प्रेम केलें. तो येथें पुण्यास मामांकडे आला होता. प्लेगनें त्याचा बळी घेतला. त्याच्या मरणाची वार्ता कळल्यावर दोन दिवस मी भ्रमिष्ट झालों होतों. मरतांना तो माझी आठवण करून मेला. तूंच तो. तो माझा भाऊ म्हणजेच तूं. तुझ्यासारखाच तो दिसे. तो तुझ्यासारखाच तेजस्वी व तरतरीत दिसे. असेच डोळे, सारें असेंच. तूं माझा तो भाऊ आहेस. संशयच, नाहीं. एकदम माझ्या हृदयांत एवढें प्रेम एकाएकीं कां उसळलें असतें ? ये, आपण पुन्हां भेटूं. वीस वर्षांचें भेटून घेऊं.'' वसंतानें त्याला पुन्हां घट्ट मिठी मारली. बारा वर्षांनीं रामहि भरताला इतक्या प्रेमानें भेटला नसेल !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel