पहिला रोगी : तो मनुष्य गेला एका डॉक्टराकडे. तो मोठा डॉक्टर होता. त्या मनुष्यानें टांगा नेला होता. डॉक्टरनें दहा रुपये घेईन म्हणून सांगितलें. त्या माणसानें कबूल केलें. डॉक्टर टांग्यांत बसणार इतक्यांत तेथें एक सायकल आली. तो म्हणाला, ''डॉक्टर, आतांच बोलावलं आहे तुम्हांला.'' पहिला मनुष्य म्हणाला, ''डॉक्टर! बायको मरते माझी चला !'' तो दुसरा मनुष्य म्हणाला, ''आधीं बोलावले आहे तुम्हांला.'' शेवटीं डॉक्टर म्हणाला, '' जो पंचवीस रुपये देईल त्याच्याकडे मी येतों. '' दुसरा मनुष्य म्हणाला, '' पत्रास घ्या परंतु चला. '' शेवटीं डॉक्टर पत्रासकडे प्रसन्न होऊन गेले.

दुसरा रोगी : आणि ती बायको ?

पहिला रोगी
: तडफडून मेली. आम्हीं उघडया डोळ्यांनीं पाहिली. त्या मानमोडींत किती डॉक्टरांनीं मोटारी घेतल्या तुला सांगूं !

दुसरा रोगी : अरे, त्या लष्करांत कोण आहे एक व्यापारी! मोठी आहे त्याची हवेली! त्याच्या कुत्र्याचा पाय दुखावला होता. रोज मोटारींतून त्या कुत्र्याला नेण्यांत येई. त्याचें ड्रेसिंग करण्यांत येई; परंतु त्याच्याकडे काम करणारी एक बाई होती. तिचें पोर आजारी होतें म्हणून एक दिवस ती कामावर जाऊं शकली नाहीं. तिला त्यांनी पुन्हा कामावर घेतलें नाहीं.

पहिला रोगी : वाटतील तेवढीं बेकार माणसें भेटतात! कां घ्यावें परत कामावर ?

बरदाशी : गप्प बसारे आतां सारे! मोठी नर्स येत आहे. नीट पांघुरणें घेऊन पडा. खाटेजवळ नर्स आली तर कोणी खोकूं नका. आधीं खोकून घ्या.

वसंता : हा काय विचित्र हुकूम आहे ?

वेदपुरुष : त्या खोकल्यांतून कदाचित् थुंकीचे तुषार उडतील व त्या तुषारांतून रोगाचे सूक्ष्म जंतु एखादे जावयाचे आणि रोग्यांची सेवा करणारी नर्सच आजारी पडायची! नर्स आजारी पडली तर दवाखाना बंद करण्याची पाळी यावयाची! जपलें पाहिजे, म्हणून हा हुकूम आहे.

वसंता : ती पाहा नर्स येत आहे.

वेदपुरुष : नाकाशीं हातरुमाल धरलेला आहे.

वसंता : शक्य तेवढी स्वच्छतेची सावधगिरी घेतलीच पाहिजे.

वेदपुरुष : तो रोगी बघ कसा खोकला आंतल्याआंत दाबून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel